महाड : प्रतिनिधी
किल्ले रायगडवरील हत्ती तलाव दुरुस्तीनंतर पूर्णपणे भरला असून, या ऐतिहासिक घटनेची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आलेले रायगड विकास प्राधीकरणचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी या तलावाचे जलपूजन केले.
हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर संवर्धनाचे काम सुरू असून, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांना यश येऊन गडावरील दुरुस्ती केलेले तलाव कित्येक वर्षांनंतर भरले आहेत. गळती असलेला हत्तीसागर तलावही दुरुस्तीनंतर पूर्ण क्षमतेने भरला आहे. याची पाहणी करण्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे शुक्रवारी (दि. 17) किल्ले रायगडावर आले होते. त्यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता बुरले, रायगड विकास प्राधिकरणचे अधिकारी, ठेकेदार उपस्थित होते.
खासदार संभाजीराजे यांनी गडावर जाताना चित्त दरवाजा ते महादरवाजा यामध्ये बांधण्यात आलेल्या पायर्या व अन्य कामाचीही पाहणी केली. मुसळधार पावसात बांधकामाला कोणतेही नुकसान झाले नसल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. प्राधीकरणाच्या संंबंधित संवर्धन कामात प्रत्येक सदस्य, स्थापत्य विषारद, कर्मचारी, अधिकारी यांचे योगदान असून, त्यांच्यामुळेच गडावरील काम दर्जेदार होत असल्याचे त्यांनी सांगितले.
हत्तीसागर तलावाला तीन ठिकाणी गळती होती. ही गळती काढण्यात रायगड विकास प्राधीकरणाला यश आले आणि त्यामुळेच आज हत्तीसागर तलाव पाण्याने पूर्ण भरलेला दिसत आहे. पावसाळ्यातील किल्ले रायगडाचे दर्शन म्हणजे प्रत्यक्ष स्वर्गलोकीच्या दर्शनाचा अनुभव आता आपल्याला मिळत असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी या वेळी आवर्जून सांगितले. दाट धुके, मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा असा माहोल रायगडी होता. याच वातावरणात छत्रपती संभाजीराजेंनी हत्ती तलावाचे जलपूजन केले. विशेष म्हणजे त्यासाठी गडावर आलेल्या रानफुलांचा वापर करण्यात आला.
Check Also
रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …
RamPrahar – The Panvel Daily Paper