Breaking News

15 दिवसांत कोरोना आटोक्यात!; नवी मुंबई पालिका प्रशासनाचा दावा

पनवेल : बातमीदार

पालिका आयुक्तांच्या तडकाफडकी बदलीनंतरही नवी मुंबई शहरात दिवसेदिवस वाढणारी कोरोना रुग्णसंख्या सर्वाच्या चिंतेचा विषय ठरू पाहत आहे. तरीही या उच्चतम रुग्णसंख्येनंतर दोन आठवडयांत करोना संख्या आटोक्यात येईल, असा आशावाद पालिका प्रशासनाच्या वतीने व्यक्त केला जात आहे. नवी मुंबईत 13 हजारांहून अधिक रुग्ण आहेत. सौम्य लक्षणे असल्याने घरी विलगीकरण करण्यात आलेले 79 हजार नागरीक आहेत. नवीन आयुक्त अभिजित बांगर यांनी स्वॅब आणि प्रतिजन तपासण्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आल्या आहेत.

धारावी झोपडपट्टी वसाहती इतकीच लोकसंख्या असलेल्या नवी मुंबईतील बाधितांची संख्या दिवसेंदिवस मोठया प्रमाणात वाढत आहे. हा नागरिकांच्या चिंतेचा विषय ठरला आहे. वाढत्या करोना रुग्णसंख्येला रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या टाळेबंदीनंतर शहरात स्थानिक पातळीवर तीनवेळा टाळेबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नागरीकांचा संयम सुटत असल्याचे दृश्य आहे. वाढती करोना संख्या आणि इतर काही कारणास्तव एक वषापूर्वी पदभार स्वीकारलेल्या आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची राज्य शासनाने बदली केली. त्यांच्या जागी अभिजित बांगर यांच्यावर करोना नियंत्रणाची जबाबदारी सोपविण्यात आली. मात्र, मिसाळ यांच्या काळातील रुग्णसंख्येपेक्षा बांगर यांच्या काळात रुग्णसंख्या वाढल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बांगर यांनी शहरात बिघडलेल्या आरोग्य यंत्रणेचा आढावा घेऊन काही बदल तातडीने केले आहेत. अनेक उपाययोजना केल्या आहेत. भविष्यात वाढणार्‍या रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी पाच हजारांहून अधिक खाटा तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. रुग्ण साखळी तोडता यावी यासाठी स्वॅब व प्रतिजन तपासण्या वाढविल्या आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या पूर्वीपेक्षा जास्त वाढली आहे. सध्या सरासरी 300 ते 325 करोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे. प्रतिबंधित भागांत अधिक कठोर उपाययोजना केल्या जात आहेत. यामुळे येत्या 15 दिवसांत रुग्णांची संख्या कमी होऊन ती आटोक्यात येईल, असा विश्वास आयुक्त अभिजित बांगर यांनी अधिकार्‍यांच्या बैठकीत व्यक्त केला. त्याच दृष्टीने प्रशासन काम करीत असून दोन अतिरिक्त आयुक्त यावर लक्ष ठेवून आहेत.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply