तीन दिवसीय सोहळ्याला प्रारंभ
अयोध्या : वृत्तसंस्था
अयोध्येमध्ये होणार्या राम मंदिर भूमिपूजन अनुष्ठान सोहळ्याला सोमवार (दि. 3)पासून प्रारंभ झाला. सकाळी गणपती पूजन झाले. मंगळवारी रामर्चा पूजन होईल, तर 5 ऑगस्टला शुभमुहूर्तावर राम मंदिर भूमिपूजन होणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तयारीचा आढावा घेतला.
अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाची तयारी जोरात सुरू आहे. या सोहळ्यासाठी मोजक्याच मान्यवरांना निमंत्रणे पाठविण्यात आली आहेत. सोहळ्यात मुख्य मंचावर पंतप्रधान मोदी यांच्यासह केवळ पाच जणच उपस्थित राहतील. यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राम मंदिर ट्रस्टचे प्रमुख महंत नृत्य गोपालदास यांचा समावेश असेल.
राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचे पहिले निमंत्रण अयोध्या प्रकरणात मुस्लिम पक्षकार इक्बाल अन्सारी यांना पाठविण्यात आले आहे. अन्सारी यांच्यासह अन्य पक्षकार हाजी महबूब यांना तसेच बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारे पद्मश्री मुहम्मद शरीफ यांनादेखील निमंत्रण देण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी
सध्या सर्वत्र कोरोनाचे संकट आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येत येणार्या पाहुण्यांसाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. ज्या ठिकाणी अतिथींच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तेथे प्रत्येक खुर्चीमध्ये पाच फुटांचे अंतर ठेवण्यात आले आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहणार्या प्रत्येक पाहुण्याला हॅण्डग्लोज, मास्क व सॅनिटायझर वापरणे सक्तीचे आहे. सध्या राम मंदिर ट्रस्टकडून कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय करण्यात येत आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper