एकाचा मृत्यू; 174 जणांना डिस्चार्ज
पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि. 6) कोरोनाचे 221 नवीन रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे तर 174 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 179 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे तर 151 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 42 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दिवसभरात 23 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
महापालिका क्षेत्रात नवीन पनवेल सेक्टर 5 नील संकल्प सोसायटीतील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रात एकूण 7531 रुग्ण झाले असून 5971 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 176 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 79.29 टक्के आहे. 1384 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
पनवेल ग्रामीण भागात कोरोनाचे नवीन 42 रुग्ण आढळले आहेत. तर 23 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
उरण तालुक्यात 17 नवे कोरोनाग्रस्त; दिवसभरात 37 रुग्णांना डिस्चार्ज
उरण : उरण तालुक्यात गुरुवारी (दि. 6) कोरोना पॉझिटिव्ह 17 रुग्ण आढळले व 37 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये कोटनाका दोन, धुतुम दोन, हनुमान मंदिरजवळ पागोटे, जेएनपीटी, गणेश कृपा निवास विमला तलाव, आवरे, जासई, चाणजे पटेल नगर, कुंभारवाडा, कैलास बी एफ नवेनगर करंजा, करंजा, कोप्रोली, बोकडवीरा, नाईक नगर म्हातवली, बालई येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 952 झाली आहे. त्यातील 786 बरे झालेले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. फक्त 132 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत व आतापर्यंत 34 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी महिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
कर्जत तालुक्यात पाच नवे बाधित
कर्जत : कर्जत तालुक्यात गुरुवारी पाच कोरोना रुग्ण आढळले आहे. आतापर्यंत तालुक्यात कोरोनाचे 573 रुग्ण आढळले असून 471 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 19 जणांनी प्राण गमावले आहेत. गुरुवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये नेरळ दोन, कर्जत, दहिवली, मुद्रे येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
महाड तालुक्यात 24 जणांना लागण
महाड : महाडमध्ये गुरुवारी कोरोनाचे 24 नवे रुग्ण आढळले असुन, 19 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये नोबेल आर्केड सुंदर वाडी तीन, बिरवाडी तीन, आमशेत दोन, नविन वसाहत दोन, वालेघर, कुंभार्डे तर्फे विन्हेरे, प्रभातकॉलनी, कृष्णा आर्केड, नांदगावकर हॉस्पीटल, जव्हार कॉलनी, अप्पर तुडील, रोहीदास नगर, भोई आळी, सिटीप्रइड, अलअसिम कॉ.पानसारमोहल्ला, महाड पोलीस ठाणे, जुई, किंजळोली येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
नवी मुंबईत 361 नव्या रुग्णांची नोंद; 429 जण कोरोनामुक्त
नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईत गुरुवारी 361 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला तर 429 जण कोरोनामुक्त झाले. नवी मुंबईतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 17 हजार 318 तर बरे झालेल्यांची 12 हजार 903 झाली आहे. गुरुवारी पाच जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 446 झाली आहे.
सद्य स्थितीत नवी मुंबईत तीन हजार 969 रुग्ण उपचार घेत आहेत. गुरुवारी दिवसभरात एक हजार 835 रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या असून, एकूण रॅपिड अँटिजेन टेस्टची संख्या 27 हजार 676 झाली आहे. तर एकूण आरटीपीसीएस टेस्ट केलेल्यांची संख्या 35 हजार 740 झाली असून कोविड टेस्ट केलेल्यांची एकूण संख्या 63 हजार 416 झाली आहे. आढळलेल्या रुग्णांची नवी मुंबईतील विभागवार आकडेवारी पाहता बेलापूर 63, नेरुळ 75, वाशी 42, तुर्भे 31, कोपरखैरणे 46, घणसोली 50, ऐरोली 44, दिघा 10 यांचा समावेश आहे.
नागोठण्यात बाधितांची संख्या वाढतीच
नागोठणे : शहरासह विभागात कोरोनाबधितांची संख्या वाढतीच असून बुधवारी नागोठण्यात तीन, तर विभागात वेलशेत येथे चार, मुरावाडी दोन आणि कडसुरे येथे एक रुग्ण आढळला असल्याची माहिती येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे यांनी दिली.
दरम्यान, रुग्ण राहत असलेल्या इमारत किंवा घराला सील केले जात असले तरी, एक दोन दिवसांतच लावलेल्या पट्ट्या काढून तेथून वर्दळ होताना दिसून येत असल्याने सील करण्यामागील नक्की उद्देश तरी काय असतो, अशी कुजबूज शहरात होत आहे.