मनसेचा ‘महावितरण’ला इशारा
कर्जत : बातमीदार
महावितरण कंपनीने वीज ग्राहकांना भरमसाठ वीज बिले पाठवली आहेत. त्यामुळे ग्राहक मेटाकुटीला आले असल्याने वीज बिलप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ‘महावितरण’च्या कार्यालयावर धडक देऊन वीज बिले सुधारली नाही, तर मनसे त्या सर्व वाढीव वीज बिलांचे गणेशोत्सव काळात विसर्जन करेल, असा इशारा देण्यात आला आहे.
कोरोनामुळे जाहीर झालेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्य सरकारने महावितरण कंपनीला सर्व ग्राहकांना त्यांच्या वीज वापराच्या सरासरी वीज बिल पाठवावी, असे निर्देश दिले होते. लॉकडाऊन शिथिल झाल्यावर महावितरणकडून ग्राहकांना भरमसाठ वीज बिल पाठविण्यात आले आहेत. याबाबत आलेल्या तक्रारींची दखल घेत कर्जत शहर मनसेच्या वतीने महावितरणच्या कार्यालयात धडक देण्यात आली. मनसे शहर अध्यक्ष समीर चव्हाण, विद्यार्थी सेना जिल्हा सचिव प्रसन्न बनसोडे, नगरसेवक धनंजय दुर्गे यांनी महावितरणचे सहाय्यक अभियंता आनंद घुले यांची भेट घेतली. या ठिकाणी कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण भोर हेही उपस्थित होते.
या वेळी मनसेने वीजविषयक तक्रारींचा पाढाच वाचला. वीज बिले तर भरमसाठ आलेलीच आहेत, पण वारंवार वीजपुरवठा खंडित होत असतो. महावितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी ग्राहकांशी बोलताना अरेरावीची भाषा करतात. महावितरणकडून नागरिकांना वेळोवेळी योग्य ती माहिती मिळत नाही असे सांगून भरमसाठ वीज बिलाचा सावळागोंधळ जर गणपती विसर्जनाआधी संपुष्टात आला नाही, तर महावितरणच्या वीज बिलांचे विसर्जन मनसे उल्हास नदीत करेल, असा इशारा देण्यात आाला. या वेळी मनसे विद्यार्थी सेना कर्जत शहर अध्यक्ष मयुरेश जोशी, तसेच राजेश साळुंखे, चिन्मय बडेकर, राजेंद्र जंगम, अजित राऊत आदी कार्यकर्ते आक्रमक झाले होते. पोलिसांनी त्यांना शांत केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper