Breaking News

धीरापोटी फळे गोमटी

आपण सगळेच सध्या अनलॉक 4च्या आनंदात आहोत. अवतीभवती बरेच काही खुले होत असल्याचा हा आनंद स्वाभाविक आहे. परंतु या आनंदाला बेफिकीरीची जोड मिळाल्यास मात्र गंभीर परिणाम भोगावे लागतील. बुधवारी महाराष्ट्रात आजवरच्या सर्वाधिक 17 हजार 433 केसेस नोंदल्या गेल्या, तर गुरूवारी देशपातळीवर आजवरच्या सर्वाधिक 83 हजार 883 नव्या केसेसची नोंद झाली. या आकड्यांची पूर्वीइतक्याच गांभीर्याने नोंद घेण्याची गरज आहे.

संपूर्ण देशात कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्राकडून या साथीच्या संदर्भात नित्य नव्या चिंतित करणार्‍या विक्रमी आकडेवारीची नोंद होते आहे. बुधवारी राज्यात कोविड-19च्या आजवरच्या सर्वाधिक, 17 हजार 433 नव्या केसेसची नोंद झाली. यामुळे राज्यातील आजवरच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या आठ लाख 25 हजाराच्या वर गेली आहे. जगभरातील कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांपैकी पाचव्या क्रमांकावर असलेल्या पेरू या देशापेक्षा महाराष्ट्रातील रुग्ण अधिक आहेत. आजच्या घडीला संपूर्ण देशातील सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण पुणे शहरात आहेत. बुधवारी पुण्यात 1706 नव्या केसेस आणि 28 मृत्यू नोंदले गेले. पुण्यासारख्या शहरात अवघ्या चाळिशीतील तरुण पत्रकाराचा वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने मृत्यू व्हावा ही किती धक्कादायक गोष्ट आहे. आणि त्यावर आरोग्यमंत्री, कोणतीही लक्षण नसलेले श्रीमंत रुग्ण आयसीयु बेड अडवित असल्याचा कांगावा करतात, याला काय म्हणावे? राज्यात कोरोना अतिशय झपाट्याने पसरतो आहे. महाराष्ट्रात कोरोनाची पहिली केस 9 मार्चला नोंदली गेली होती. त्यानंतर 126 दिवसांनी, 12 जुलै रोजी आपल्याकडील केसेस एक लाखांवर गेल्या होत्या. परंतु नंतर अवघ्या 51 दिवसांत महाराष्ट्राने दोन लाख केसेसचा टप्पा ओलांडला. सत्ताधारी महाविकास आघाडीने हे असे केले आहे कोरोना महामारीचे नियंत्रण! अगदी सुरूवातीपासून देशातील एकूण कोरोना केसेसमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक भर टाकली आहे. स्वाभाविकपणे देशातील इतर अनेक राज्यांत बरेच काही खुले होत असताना महाराष्ट्रात मात्र सरकार कमालीच्या सावधपणे पावले टाकते आहे. आपला देशपातळीवरील कोरोना मृत्यूदर जगभरातील सर्वात कमी आहे. जगातील सरासरी मृत्यूदर 3.3 टक्के असून भारतात तो 1.76 टक्के इतका आहे. अर्थात देशपातळीवरही गुरूवारी आजवरच्या सर्वाधिक 83 हजार 883 इतक्या केसेसची नोंद झाली. मात्र त्याचवेळेस गेल्या 24 तासांत 11 लाख 72 हजार 179 इतक्या विक्रमी कोरोना चाचण्यांचीही नोंद झाली हे लक्षात घेतले पाहिजे. आजवर देशात चार कोटी 55 लाखाच्यावर कोरोना चाचण्या झाल्या असून एकूण रुग्णसंख्या 38 लाखांच्यावर गेली आहे. कोरोनाचे थैमान रोखण्यासाठी आपण देश पातळीवर कठोर लॉकडाऊन राबविला. परंतु कालांतराने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आर्थिक व्यवहार खुले करणे भागच होते. केंद्र सरकारने योग्य विचारविनिमय करून व राज्य सरकारांना निर्णय घेण्यास पुरेसा वाव देत अनलॉकची मार्गदर्शक तत्वे वेळोवेळी जाहीर केली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटल्याप्रमाणे, महामारी संपल्याचा आव कुठल्याच देशाला आणता येणार नाही. सगळ्यांना पुरेशी सावधगिरी बाळगतच पुढे जावे लागणार आहे. हा विषाणू आजही सहज पसरतो आहे. तेव्हा त्याचा फैलाव रोखणे व रुग्णांचे जीव वाचवणे याबाबत गंभीर राहावेच लागणार आहे.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply