Breaking News

वाढीव वीज बिलांची भाजपकडून होळी

अलिबागसह रायगडात ठिकठिकाणी आंदोलने

अलिबाग : प्रतिनिधी
महावितरण कंपनीने दिलेल्या भरमसाठ वीज बिलांविरोधात सोमवारी (दि. 7) भारतीय जनता पक्षाकडून रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. या वेळी वीज बिलांची होळी करून महावितरणसह राज्य सरकारचा निषेध केला गेला. अलिबाग विभागीय कार्यालयासमोर बोलताना भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी वीज बिले सरसकट माफ करा; अन्यथा उग्र आंदोलन करू, असा इशारा दिला.  
कोरोनामुळे लॉकडाऊन काळात महावितरणने ग्राहकांच्या मीटरचे रीडिंग घेतले नव्हते. त्यानंतर जून महिन्यात निसर्ग चक्रीवादळ झाल्याने जिल्ह्यातील अनेक ठिकाणी महिनाभर वीजच नव्हती. ऑगस्ट महिन्यात महावितरणने मीटर रीडिंग घेऊन ग्राहकांना पाच महिन्यांची एकत्रित बिले दिली आहेत. त्यामुळे भाजपतर्फे सोमवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले.
अलिबाग येथील विभागीय कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करण्यात आली. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्यासह उपाध्यक्ष हेमंत दांडेकर, तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, अशोक वारगे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी महावितरणचे अलिबाग येथील सहाय्यक कार्यकारी अभियंता डी. बी. चिपरिकर यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले.
आजचे आंदोलन म्हणजे राज्य सरकारला इशारा आहे. जर सरकारने वीज बिल सरसकट माफ केले नाहीत; तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा  या वेळी अ‍ॅड. मोहिते यांनी दिला.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply