Breaking News

मुरूडचे पर्यटन बहरतेय

घोडेस्वारीकडे पर्यटकांचा कल

मुरूड ः प्रतिनिधी  
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी कालवधीत सर्वत्र हॉटेल्स तसेच लॉजिंग रेस्टॉरंट्स गेली अनेक महिने बंद होती, परंतु आता संचारबंदीत शिथिलता आल्यानंतर तसेच ई-पास रद्द केल्यामुळे लोकांना सर्वत्र जाण्याची मुभा मिळाली आहे. परिणामी आता पर्यटक हळूहळू बाहेर पडू लागले आहेत. मुरूड येथे आता शनिवार-रविवारी पर्यटक दिसू लागले आहेत. त्या अनुषंगाने पर्यटक आल्याने समुद्रकिनारी घोडागाडीवर उपजीविका असणार्‍या लोकांना आता स्वयंरोजगार उपलब्ध होऊ लागला आहे.
पर्यटकांचा ओघ आता हळूहळू मुरूडकडे येऊ लागला आहे. विशेषतः शनिवार-रविवारी पर्यटक समुद्रकिनारी दिसू लागले आहेत. सायंकाळी समुद्रस्नान व घोडेस्वारीकडे पर्यटकांचा कल दिसून येतो. सध्या समुद्रावरील शंख पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. मुरूडमधील लॉजिंगवरही काही प्रमाणात गर्दी दिसत आहे. त्यामुळे आता हळूहळू मुरूडचे पर्यटन बहरणार आहे. याबाबत लॉजिंग व हॉटेल व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले असून लवकरात लवकर परिस्थिती सुधारून कोरोनाचा प्रभाव कमी व्हावा, अशी
प्रार्थना करण्यात येत आहे.सर्व लॉजिंग व्यावसायिकांकडून सॅनिटायझर, मास्क व सोशल डिस्टन्सचे काटेकोरपणे पालन केले जात आहे.
याबाबत मुरूडमधील सुप्रसिद्ध बांबू हाऊस लॉजिंगचे मालक प्रयाग केंडू यांनी सांगितले की, मुरूडला मागील आठवड्यात 50पेक्षा जास्त पर्यटक आले होते. यामुळे पर्यटन फुलण्यास मदत होणार आहे. आलेल्या पर्यटकांना आम्ही संपूर्ण रूम सॅनिटाइझ करून देत असून शासनाचे सर्व नियम तंतोत पाळण्यावर आमचा भर आहे. येथे पर्यटकांना ताजी मासळी मिळते. लवकरच ऐतिहासिक सुप्रसिद्ध जंजिरा किल्ल्यावरील शिडांच्या बोटीही सुरू करण्यात याव्यात, जेणेकरून पर्यटक येथे येऊ शकतील. जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला केल्यास पर्यटकांची संख्या निश्चितच वाढेल, असा विश्वासही केंडू यांनी व्यक्त केला. 

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply