Breaking News

कर्जतमध्ये 3750 किलो रक्तचंदनाचा साठा जप्त; तिघांना अटक

कर्जत : बातमीदार

कर्जत तालुक्यातील साळोख ग्रामपंचायत हद्दीत नारळेवाडीत एका गोटफार्ममधून 3750 किलो रक्तचंदनाचा साठा जप्त करण्यात आला आहे. अलिबाग येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शनिवारी (दि. 12) ही कारवाई केली. या रक्तचंदनाची किंमत सुमारे एक कोटी 80 लाख रुपये असून, या प्रकरणी गोटफार्मच्या मालकासह तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला नारळेवाडी येथील एका फार्ममध्ये अवैधरीत्या रक्तचंदन साठवून ठेवल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने अकबर हुसेन उर्फ राजूभाई याच्या गोटफार्मची झडती घेतली असता तेथे रक्तचंदनाचा साठा आढळून आला. रक्तचंदनाच्या लाकडाचे तुकडे करून ते खोक्यात भरून विकण्याचा व्यवसाय हा गोटफार्म मालक साथीदारांसह करीत होता. या ठिकाणी गोण्यांमध्ये कापलेले तब्बल 3750 किलो रक्तचंदन तसेच पावडर आढळून आली, तसेच इलेक्ट्रॉनिक करवत, कटर, वजनकाटा, अन्य वस्तूंची मिळून ही एकूण किंमत एक कोटी 88 लाख इतकी आहे. पोलीस उपनिरीक्षक एस. बी. निकाळजे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी गोटफार्मचा मालक अकबर हुसेन उर्फ राजूभाई (चिता कॅम्प, मानखुर्द, मुंबई), आलीम (पूर्ण नाव आणि पत्ता माहीत नाही.) तसेच पश्चिम बंगालमधील परगणा जिल्ह्यातील उमनागर घोषालाटी येथील मूळ रहिवासी असलेला हसनुर रज्जाक अशा तिघांना अटक करण्यात आली आहे, तर अन्य काही जण तेथून पळून गेले आहेत.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply