Breaking News

मागणी वाढली- आली अर्थचक्राची गाडी पकडण्याची वेळ

कोरोना साथीच्या या अभूतपूर्व संकटात किती हानी झाली, याची आता केवळ चर्चा करण्यापेक्षा त्या चक्राला गती देण्यासाठी आपण खारीचा वाटा उचलला पाहिजे. अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्यासाठी मागणीच्या बाजूकडे दुर्लक्ष करून चालत नाही. ती मागणी भारतात भरपूर आहे. ती वाढत असल्याचे ताजी आकडेवारी सांगते आहे. वाढत्या मागणीचा अर्थ शेअर बाजार आणि गुंतवणूकदार समजून घेत आहेत. आपण या गाडीत बसणार आहोत की गाडी सुटल्याची तक्रार करत बसणार आहोत?

एखाद्या मोठ्या दुर्घटनेत जेव्हा मनुष्यहानी आणि वित्तहानी होते, त्यातून कुटुंब किंवा संस्थेला सावरायला वेळ लागतो. पण मग वेळ अशी येते की अशा दुर्घटनेचे दु:ख मागे सारून,‘चला, आता कामाला लागा’, असे म्हटले जाते आणि माणसे आहे त्या स्थितीत कामाला लागतात. अर्थात, असे म्हटले तरी सर्वच माणसे कामाला लागतात, असे होत नाही. त्यातील काही माणसे दु:खाला कुरवाळत बसतात आणि स्वत:चे जीवन जणू थांबवून टाकतात. ते दु:खी असतात, हे समजण्यासारखे असते, पण इतरांनीही त्यांच्यासारखे दु:खाला कवटाळून बसावे, असे त्यांना वाटत असते. त्यामुळे किती हानी झाली, याचा ते पुनःपुन्हा पाढा वाचत असतात. हानी मोठी झालेली असते, हे खरेच असते, पण त्या स्थितीतून बाहेर पडण्याचा एकच मार्ग असतो, तो म्हणजे थांबलेले व्यवहार सुरु करणे. ते सुरु होतील, यासाठी जे काही करणे शक्य असेल, ते करणे. त्यालाच आपण जीवन म्हणतो.

कुटुंबाच्या आणि संस्थेच्या जीवनात जसे घडते, तसेच सध्या आपल्या देशाच्या जीवनात घडते आहे. एखादे वाईट स्वप्न पडावे, असे कोरोना संकटात आपण सध्या जगत आहोत. पण मानवी आयुष्य इतका दीर्घकाळ एका जागी थांबवून चालणार नाही, असे आता बहुतेकांना वाटू लागल्याने समाजातील बहुतांश नागरिक आता कामाला लागले आहेत. भारतीय अर्थव्यवस्था पूर्वीचा वेग पकडण्यास वेग घेणार आहे, हे सांगण्यासाठी आता कोणा तज्ञाची गरज नाही. मनुष्यबळ आणि वित्तीय हानी झाल्यामुळे ते गृहीतच आहे. त्यात अजून कोरोनाची भीती पूर्णपणे गेली नसल्याने वेगावर काही मर्यादा आल्या आहेत. पण अशा नकारात अडकून आता चालणार नाही, असे बजावून बहुतांश नागरिक कामाला लागल्याने त्याचे प्रतिबिंब ताज्या आर्थिक आकड्यांत दिसू लागले आहे, ही निश्चितच मनाला उभारी देणारी गोष्ट आहे.

* अर्थचक्र फिरू लागल्याचा पुरावा

देशाची अर्थव्यवस्था कोठे चालली आहे, यासंबंधीचे जे आकडे महत्वाचे मानले जातात, ते पाहिले की याची खात्री पडते. उदा. कोरोनामुळे देश थांबला असताना मालमत्तेची नोंदणी थांबली होती, पण सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात दररोज सरासरी तीन हजार 936 दस्तांची नोंदणी झाली आहे. युपीआय आणि आयएमपीएस व्यवहारांची गेल्या 12 महिन्यांची सरासरी 1.96 लाख कोटी इतकी होती, ती गेल्या तीन महिन्यात 3.29 लाख कोटी एवढी झाली आहे. सप्टेंबरला ई वे बिल 9.6 टक्क्यांनी वाढले असून आंतरराज्य वाहतुकीचे प्रमाण आता कोरोनापूर्व स्थितीत आले आहे. ट्रक वाहतूक बंद पडल्याने रेल्वे वाहतुकीचे प्रमाण या काळात वाढले, पण त्यातही सप्टेंबरमध्ये तब्बल 15 टक्के वाढ नोंदविली गेली आहे. कोरोनामुळे दुचाकी आणि चार चाकी गाड्यांना पुन्हा मागणी वाढली असून सप्टेंबरमध्ये कारविक्री तब्बल 31 टक्क्यांनी वाढली असून तो गेल्या 26 महिन्यातील उच्चांक आहे. देशभरातील उत्पादन वाढ मोजतात, ते ही (पीएमआय) 56.8 इतके झाले असून ही आठ वर्षातील सर्वाधिक वाढ आहे. (चीनच्या आयातीवर बंदी घातली गेल्याचा हा परिणाम असू शकतो.) चीनमधून होणारी आयात काही देशांनी कमी केल्याचा परिणाम असू शकेल, पण सप्टेंबरमध्ये भारताची निर्यातही 5.27 टक्क्यांनी वाढून ती 27.4 अब्ज डॉलर एवढी झाली आहे. विमानप्रवास करणार्‍यांची संख्या 25 सप्टेंबरला संपलेल्या आठवड्यात 13 लाखांवर गेली आहे, जी 29 मेला संपलेल्या आठवड्यात 38 हजार एवढीच होती. जीएसटी संकलनाचा आकडा तर सर्व काही सांगून जाणारा आहे. सप्टेंबरमध्ये 95 हजार 480 कोटी रुपये संकलन झाले आहे, जे ऑगस्टपेक्षा चार टक्क्यांनी अधिक आहे. अर्थात, कोरोनापूर्व महिन्यांत त्याने एक लाख कोटी रुपयांना ओलांडले होते, पण इतक्या लवकर ती अपेक्षा करता येणार नाही. 6 ऑक्टोबरला संपलेल्या आठवड्यात वीज वापर 14 टक्क्यांनी वाढला असून विजेची मागणी सर्वाधिक असते, अशा प्रहरी देशाला आता एक लाख 65 हजार 501 मेगावॉट वीज लागू लागली आहे. ती गेल्या वर्षीपेक्षा 13 टक्क्यांंनी वाढल्याचे या महिन्याचे आकडे सांगत आहेत. एप्रिलमध्ये पेट्रोलचा वापर 60, तर मेमध्ये 38 टक्क्यांनी घटला होता, तो सप्टेंबरमध्ये दोन टक्क्यांनी वाढला आहे तर डिझेलची घट आता फक्त पाच टक्के भरून यायची आहे.

* चमक वाढली असे पाच क्षेत्र

आकडेवारी अशी बरीच देता येईल, तिचा मतितार्थ एकच आहे, तो म्हणजे सर्वात वाईट होते, ते आता आपण मागे सोडले असून जीवन पुन्हा गती घेऊ लागले आहे. शेअर बाजाराचा निकष 100 टक्के मान्य करण्याचे काही कारण नाही, पण त्याकडे पूर्ण दुर्लक्षही करता येणार नाही. भारतीय अर्थव्यवस्था वेग घेऊ लागली आहे, याला जागतिक आर्थिक संस्थांनी दुजोरा दिला असून परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. सेन्सेक्स 40 हजारांवर गेला, हे त्याचेच प्रतिबिंब आहे. त्यात गेल्या तीन महिन्यांत 50 टक्के सुधारणा झाली आहे. अर्थात, आयटी, फार्मा, रिझर्व बँकेच्या धोरणानंतर बँका, जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन करणार्‍या कंपन्या आणि शेती क्षेत्राशी संबंधित कंपन्यांची चमक आता वाढली आहे, हा बदल लक्षात घेतला पाहिजे. ग्रामीण भागातून येणारी मागणी वाढल्यामुळे मोटरसायकलींचा खप तब्बल 20 टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळेच त्यांचे उत्पादन करणार्‍या बजाज ऑटो, हिरोमोटोकॉर्प, आयशर मोटर्ससारख्या कंपन्या बाजारात धावताना दिसत आहेत. भारतीय शेती ट्रॅक्टरने करण्याचे प्रमाण वाढल्याचे आकडेवारी वरून म्हणता येईल, कारण ट्रॅक्टरचा खप सातत्याने वाढतोच आहे.

* शेतीक्षेत्र अर्थचक्राच्या मदतीला

ज्यांचा रोजगार गेला, ज्यांचे व्यवसाय बंद राहिले किंवा जगच थांबल्याने ज्यांना सर्व काही थांबले होते, त्यांना या संकटातून बाहेर येण्यास वेळ लागणार. त्यांना मदतीची गरज आहे. पण ज्यांना ही झळ तुलनेने कमी बसली, त्यांनी आपले दिनक्रम सुरु केले असल्याचे या सर्व आकडेवारीवरून स्पष्ट होते. अर्थव्यवस्थेचाच विचार करावयाचा तर कोरोनानंतर भारताचे अर्थचक्र लवकर वेग घेऊ शकते. याचे कारण भारतात असलेली मागणी. 138 कोटी ग्राहकांचीही अशी शक्ती आहे, जिला आपले जीवन समृद्ध करण्यासाठी अजून खूप काही करावयाचे आहे. अनेक भौतिक सुखे त्यांना अजून मिळवायची आहेत. त्यामुळे सध्याच्या जगाचे चाक ज्या मागणीमुळे अडले आहे, ते चाक भारतात लवकर वेग घेऊ शकते. शिवाय या काळात तुलनेने कमी परिणाम झालेलेआणि निसर्गाची कृपादृष्टी झालेले शेतीक्षेत्र अर्थचक्राच्या मदतीला आले आहे. त्यामुळे कोणी काय केले पाहिजे, याची चर्चा भरपूर होऊ शकते, पण व्यवहार त्याचे वाट पाहत नाहीत. व्यवहार हे गरजेपोटी वेग घेत असतात. ती गरज भारतात भरपूर आहे.

* ग्राहक आणि निर्माते होऊयात…

भारताचे दीर्घकालीन आर्थिक प्रश्न भरपूर आहेत आणि त्यांची उत्तरे शोधण्याचे काम धोरणकर्ते करतच आहेत. ते होत राहतील. पण अशा अभूतपूर्व संकटातून बाहेर पडण्यासाठी एक नागरिक म्हणून आपण जो खारीचा वाटा उचलू शकतो, तो आपण उचललाच पाहिजे. कारण त्याशिवाय भारतीय अर्थ व्यवस्थेचा सेतू बांधण्याचे काम पूर्ण होऊ शकत नाही. अर्थव्यवस्था किती खाली आली आहे, जीडीपी किती घसरला आहे, बेरोजगारी किती वाढली आहे, उद्योग व्यवसाय कसे बंद पडले आहेत, ही चर्चा राजकीय पातळीवर होऊ शकते, पण सर्वांच्या जीवनाला व्यापून असलेले अर्थचक्र वेग घेऊ शकत नाही. ते घेण्यासाठी नागरिकांना ग्राहक आणि निर्माता म्हणून सक्रीय होऊन आपला वाटा उचलावाच लागेल.

-यमाजी मालकर

ymalkar@gmail.com

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply