Breaking News

भाजप महिला मोर्चाचे आंदोलन; सुधागड तहसीलदारांना निवेदन

पाली : रामप्रहर वृत्त

महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. असा आरोप करून राज्य सरकारने महिला सुरक्षेसाठी कडक कायदे करण्याची मागणी करीत सुधागड भाजप महिला मोर्चातर्फे तहसील कार्यालयासमोर सोमवारी (दि. 12) आंदोलन करण्यात आले. या वेळी तहसीलदार दिलीप रायन्नावार यांच्या अनुपस्थितीत नायब तहसीलदार वैशाली काकडे यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचार विनयभंग व महिला हत्याकांडाची सत्र सुरूच आहे त्यातच कोरोना महामारीसारख्या अति संवेदनशील काळातही हॉस्पिटलमध्ये महिलांवरील अत्याचार आणि विनयभंगाचे प्रकार घडत आहेत. आघाडी सरकार महिला सुरक्षेबाबत असंवेदनशील व निष्क्रिय आहे. तसेच या सरकारचा अंकुश नसल्यामुळे प्रशासनदेखील महिला अत्याचाराच्या घटनांना गांभीर्याने घेत नाही. त्या संदर्भात प्रदेश भाजप महिला मोर्चा तर्फे 22 सप्टेंबर 2020 रोजी महाराष्ट्रातील सर्व संबंधित अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र असंवेदनशील महाविकास आघाडी सरकारने कोणतेही पाऊल न उचलल्यामुळे सोमवारी (दि. 12) प्रदेश भाजपा महिला मोर्चा तर्फे राज्यात महिलांवर होणार्‍या अत्याचाराविरोधात तसेच त्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव राज्यव्यापी आंदोलन केले. त्याचाच एक भाग म्हणून सुधागड तालुका महिला मोर्चातर्फे सोमवारी तहसिल कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला सुरक्षेबाबत त्वरित कडक कायदे करावेत, अशी मागणी करण्यात आली. यावेळी भाजप महिला मोर्चाच्या दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुचित्रा सावरगावकर, सुधागड तालुका अध्यक्षा आरती भातखंडे, वैशाली मपारा, अ‍ॅड. स्वरदा साने, योगिनी भातखंडे, जयश्री पोंगडे, उर्मिला महाले, प्राजक्ता किंजवडे, भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, सुधागड तालुका अध्यक्ष चंद्रकांत घोसाळकर, युवा मोर्चा अध्यक्ष रोहन दगडे, सरपंच भाऊ कोकरे, सागर मोरे, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply