आजच्या घडीला देशाला नेमक्या ज्या संदेशाची आत्यंतिक गरज आहे नेमका तोच संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संध्याकाळी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणातून दिला आहे. एखाद्या कुटुंबप्रमुखाला वाटावी तशी त्यांना देशवासीयांप्रति वाटणारी कळकळ या वेळी त्यांच्या शब्दाशब्दातून जाणवत होती. त्यांच्यावर प्रेम करणारे भारतीय त्यांचा हा संदेश अतिशय गांभीर्याने घेतील अशी अपेक्षा आहे.
नुकत्याच सुरू झालेल्या सणासुदीच्या मोसमामुळे देशभरातील बाजारपेठा उजळून निघाल्या आहेत, खरेदीसाठी उत्साहाने लोटलेल्या गर्दीने गजबजू लागल्या आहेत. गेले सात महिने देशात कोरोना विषाणूच्या थैमानामुळे जगण्यातील चैतन्यच जणू हरपले होते. महामारीला सुरुवात होताच इतर अनेक देशांप्रमाणेच भारतातही अत्यंत शिताफीने लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. अफाट लोकसंख्येच्या भारताचा या महाभयंकर महामारीत कसा निभाव लागणार याची चिंता जगभरात अनेक स्तरांवर व्यक्त करण्यात आली होती, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने वेगाने आणि विचारपूर्वक पावले उचलत या महामारीवर उत्तम रीतीने नियंत्रण मिळवले. सोबतच अर्थव्यवस्था सावरण्यासाठी टप्प्याटप्प्याने अनलॉकची घोषणा करीत हलकेहलके व्यवहार सुरू करण्यात आले. ऑक्टोबर महिन्यात अनलॉक 5च्या घोषणेपाठोपाठच अवतरलेल्या सणासुदीच्या मोसमामुळे मात्र जणू काही लॉकडाऊन पूर्णपणे संपल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्याकडेच निर्देश करीत मोदीजींनी लॉकडाऊन गेला आहे, परंतु कोरोना गेलेला नाही, हा अत्यावश्यक संदेश आपल्या भाषणात अधोरेखित केला. अनेक लोक सध्या अतिशय बेफिकिरीने वागत आहेत. मास्क न वापरता सर्रास बाहेर हिंडत आहेत, सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडताना दिसत आहे. याचा उल्लेख करीत हे असे वर्तन करणारे आपल्या कुटुंबाला, घरातील लहानग्यांना आणि वडीलधार्यांना धोका निर्माण करीत आहेत, असा इशारा पंतप्रधानांनी दिला. बेदरकार वर्तन करणार्यांपर्यंत हा संदेश पोहचावा आणि सगळ्यांनाच जबाबदारीची जाणीव व्हावी. काही जणांच्या बेफिकिरीमुळे सणासुदीच्या दिवसांत अनेकांचा आनंद हिरावून घेतला जाऊ शकेल, हा मोदीजींनी दिलेला इशारा गांभीर्याने घेतला पाहिजे. गेले सात-आठ महिने आपण सार्यांनीच कमालीची काळजी घेतली आहे. सगळ्यांच्याच प्रयत्नांतून आज देशातील स्थिती सावरली आहे. येथवर आल्यानंतर परिस्थिती पुन्हा बिघडू न देण्याची काळजीही आपणच घ्यायची आहे याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली आहे. आज देशातील रुग्णांचा बरे होण्याचा दर उत्तम आहे, मृत्यूदर अतिशय कमी आहे, परंतु अनेक लोक नेमके अशा परिस्थितीत सावधगिरी बाळगणे बंद करताना दिसत आहेत. या अशा वर्तनाविरोधात जे कुणी समाजामध्ये जागरूकता निर्माण करतील, ती देशासाठी मोठी सेवा ठरेल, असे आवाहनही पंतप्रधानांनी या वेळी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी जनजागरणासाठी पुढे यायला हवे. जोवर कोरोनावरील लस वा औषध हातात येत नाही, तोपर्यंत आपल्याला कोरोनाविरोधातील लढाईत ढिलेपणा आणता येणार नाही. अवघ्या जगात कोरोनाविरोधी लस आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. भारत तर जगातील प्रमुख लस उत्पादकांपैकी एक आहे. भारतातही या दिशेने जोरदार प्रयत्न सुरू आहेत. लस हातात येताच टप्प्याटप्प्याने ती प्रत्येकापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाहीही पंतप्रधानांनी दिली आहे, मात्र तोवर आपल्याला आपली जबाबदारी न विसरता सर्व दक्षता सजगपणे पाळायच्याच आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper