बीड : भाजपच्या राष्ट्रीय नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यानिमित्त सावरगाव घाट येथे भगवानगडावर जोशपूर्ण भाषण केले. मी आता राष्ट्रीय मंत्री असल्याचे सांगत पक्षवाढीसाठी आपली जबाबदारी वाढल्याचेही पंकजा यांनी म्हटले. कोरोनामुळे दसर्या मेळाव्याला गर्दी नाही, पण गर्दीचे विक्रम मोडणार दसरा मेळावा आपण घेऊ. एक दिवस शिवाजी पार्क मैदानावर आपण दसरा मेळावा भरवणार असल्याचे पंकजा यांनी या वेळी म्हटले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा होती, पण भगवानगडावरून दसरा मेळाव्यात बोलताना त्यांनी पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम दिला. पंकजा मुंडे म्हणाल्या की, दसर्यानिमित्त ऑनलाइन मेळावा असूनही राज्याच्या कानाकोपर्यातून लोक भगवानगडावर आलेत.निवडणुकीनंतर काहींना वाटले पंकजा मुंडे संपल्या. ज्यांना मी संपल्याचे वाटते त्यांनी ही जनसंपत्ती जरूर पाहावी, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. मी घर बदलणार नाही. आता राष्ट्रीय मंत्री झाली आहे. देशपातळीवर पक्षाचे काम करणार. तुम्ही धीर सोडू नका. कुठलाही व्यक्ती पक्षापेक्षा मोठा होऊ शकत नाही, पक्षाचा विचार मोठा असतो, पण मुंडेसाहेब पक्षापेक्षा मोठे झाले. विरोधी पक्षातील लोकही त्यांचा आदर करतात, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले. पहिले मी वाट्टेल तेवढा निधी द्यायचे. निधीच्या रूपात पैशांचा पाऊस पाडला. आता रस्त्यावर उतरून आम्ही सरकारला जाब विचारणार आहोत. या सरकारच्या चांगल्या कामांचे कौतुक करण्याचे धारिष्ट्य गोपीनाथ मुंडेंच्या कन्येत आहे. त्याचप्रमाणे या सरकारला जाब विचारण्याची हिंमतदेखील आहे. हे धारिष्ट्य तुम्हा सगळ्यांच्या बळावर आहे. माझे जीवनच तुम्हाला अर्पण आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. मुंडेसाहेब जिल्हा परिषदेलाही उभे नव्हते. भाजपचे सरकार येईल असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते. जेव्हा मुंडेसाहेबांनी राजकीय जीवनाला सुरुवात केली तेव्हा मित्रांसोबत बसून मी शिवाजी पार्क भरून सभा घेणार, असे बोलले होते. मुंडेसाहेबांच्या संघर्ष यात्रेचा समारोप शिवतीर्थावर झाला. त्यामुळे शिवतीर्थावर एक दिवस मी सभा घेतल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धारही पंकजा मुंडे यांनी या वेळी व्यक्त केला.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …