नवी दिल्ली : वृत्तसंस्था
क्रिकेटचे सामने आणि प्रेक्षक हे एक यशस्वी समीकरण मानले जाते. क्रिकेटच्या सामन्याला जितकी प्रेक्षकांची हजेरी जास्त, तितका सामन्याला रंग चढत असतो, पण कोरोनाच्या काळात क्रिकेट आणि प्रेक्षक यांची ताटातूट झाली. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात विनाप्रेक्षक सामना खेळवण्यात आला. त्यानंतर जवळपास चार ते पाच महिने क्रिकेट बंद होते. ऑगस्टमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा सुरू झाले. त्यानंतर सप्टेंबरमध्ये भारताबाहेर का होईना, पण भारतीय क्रिकेटचा उत्सव अर्थात आयपीएलची सुरुवात झाली. सध्या होणारे सारे सामने हे विनाप्रेक्षक खेळवले जात आहेत, पण लवकरच टीम इंडियाच्या एका सामन्याला प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 27 नोव्हेंबर ते 19 जानेवारी या कालावधीत क्रिकेट मालिका होणार आहे. यातील कसोटी मालिकेला 17 डिसेंबरपासून सुरुवात होणार असून, मेलबर्नच्या मैदानावर बॉक्सिंग डे टेस्ट खेळवली जाणार आहे. नाताळच्या दुसर्या दिवशी (26 डिसेंबर) खेळल्या जाणार्या सामन्याला बॉक्सिंग डे सामना म्हणतात. या कसोटी सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार असल्याची चर्चा आहे. मेलबर्नच्या स्टेडियममधील आसनक्षमतेच्या 25 टक्के म्हणजेच अंदाजे 25 हजार लोकांना सामन्यासाठी उपस्थित राहण्याची परवानगी देण्याचा विचार ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड करीत आहे.
कोविड सेफ प्लान
स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश मिळावा यासाठी व्हिक्टोरिया सरकार, मेलबर्न क्रिकेट क्लब आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकत्रितपणे काम करीत असून, कोविड-19पासून सुरक्षा करण्याबाबतची नवी नियमावली तयार केली जात आहे. कोविड सेफ प्लान अंतर्गत आम्ही बॉक्सिंग डे कसोटीबाबत चर्चा करीत आहोत, असे मेलबर्न क्रिकेट क्लबचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टुअर्ट फॉक्स यांनी सांगितले.
RamPrahar – The Panvel Daily Paper