महाड : प्रतिनिधी
महाड पोलिसांनी खाडीपट्टा विभागात सुरू असलेल्या अनधिकृत वाळू उत्खनन आणि विक्रीवर कारवाई करीत वाळूसह पोकलेन आणि अन्य तीन वाहने जप्त केली आहेत. या कारवाईत सुमारे 47 लाख 97 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून, पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईने वाळू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. महाड तालुक्यातील वलंग गावाच्या हद्दीत खाडीकिनारी अनधिकृतरित्या वाळू उत्खनन आणि विक्री सुरू असल्याची माहिती महाड उपविभागीय पोलीस अधिकारी एन. तांबे यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार त्यांनी महाड पोलीस ठाण्याच्या पथकासह रविवारी (दि. 1) दुपारी वलंग जांभळी परिसरात कारवाई केली. या वेळी तेथे पोकलेनचा वापर करून अनधिकृतरित्या वाहनात वाळू भरण्याचे काम सुरू होते. पथकाने 36 लाख किमतीची पोकलेन, तीन लाख किमतीच्या दोन होड्या, 72 हजार रुपयांची वाळू, तीन लाख 25 हजार रुपये किमतीची महिंद्रा वेरीटो कार (एमएच 06-एझेड 8591), तीन लाख किमतीची मारुती स्विफ्ट (एमएच 06-बीई 5607), दोन लाख रुपये किमतीची मारुती वॅगन आर (एमएच 08-एजी 757) असा एकूण 47 लाख 97 हजार रुपये किमतीचा माल जप्त केला. या प्रकरणी महाड तालुका पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी शौकत वहाब इसाने (वय 60, रा. वहूर), शाहनवाज शमसुद्दीन मुकादम (33, महाप्रळ), लुकमान कादिर चिखलकर (30, तीडे, मंडणगड), अतिक अकबर डांगू (23, किमलोळी, मंडणगड), फैजल हमीद मुकादम (30, महाप्रळ) यांना अटक करण्यात आली आहे, तर जावेद इसाने (45, वहूर) आणि अमीर देशमुख (50, लोअर तुडील) यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या घटनेचा अधिक तपास निरीक्षक एम. एन. गवारे करीत आहेत.