Breaking News

फटाके विक्रीस तूर्त मोकळीक; नवी मुंबईतील गर्दीवर मात्र दक्षता पथकांची नजर

नवी मुंबई ः प्रतिनिधी

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने फटाके फोडण्यास मज्जाव केला असला तरी नवी मुंबईत अद्याप अशा प्रकारचा कोणताही निर्णय झाला नाही, मात्र बंदी नसली तरी प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कोरोनाचा आजार श्वसनाशी संबंधित असल्यामुळे अशा रुग्णांना फटाक्यांच्या प्रदूषणाचा त्रास होण्याचा दावा समाजमाध्यमांवर केला जात आहे. काही राजकीय पक्षांनी यंदाच्या दिवाळीत फटाके विक्री आणि वाजविण्यास बंदी घालण्याची मागणी काही दिवसांपूर्वी केली होती. तसेच राज्यभरातही अशाच प्रकारची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर राज्याच्या मंत्रिमंडळात याबाबत निर्णय होण्याची शक्यता होती. प्रत्यक्षात मात्र तसे झाले नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने दिवाळीसंदर्भात नवी नियमावली तयार केली असून त्यात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी घातली आहे. तसेच केवळ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाके फोडण्यास परवागनी देण्यात आली आहे. अशाच प्रकारचा निर्णय ठाणे जिल्ह्यातही होण्याची शक्यता वर्तविली जात होती, परंतु जिल्हा आणि पालिका प्रशासनाकडून अद्याप अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. यासंदर्भात नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांच्याशी संपर्क साधला असता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. कोरोना कमी झाला म्हणजे संपला असे नाही. त्यामुळे दिवाळीच्या सणासुदीत सामाजिक अंतराचे भान ठेवून नागरिकांनी नियम पाळले तरच आजची कोरोनाची स्थिती लवकर संपुष्टात आणण्यात यश येईल. त्यामुळे गर्दी टाळा, असे आवाहन त्यांनी केले आहे. मुंबई पालिकेच्या फटाक्यांसदर्भात घेतलेल्या निर्णयाबाबत आम्हीही विचार करीत आहोत, मात्र शासनाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यास त्याप्रमाणे निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नियम न पाळल्यास कारवाई

शहरात दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहेत. बाजारात होणार्‍या गर्दीमुळे अधिक धोका संभवतो. त्यामुळे पालिकेने नेमलेली दक्षता पथके या गर्दी नियंत्रणासाठी सक्रिय करण्यात आली आहेत. या पथकांद्वारे गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवले जाणार असून नियम न पाळणार्‍या नागरिकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. आपल्यामुळे कुठेही गर्दी होणार नाही व आपण गर्दीत जाणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे व कोरोना नियमांचे पालनही काटेकोरपणे केले पाहिजे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply