मुरुड : प्रतिनिधी
येथील महाराष्ट्र बँकेच्याशेजारी असलेल्या एका इमारतीला सोमवारी (दि. 16) रात्री आग लागली. या आगीत भाजी व फळांचे दुकान भस्मसात झाले. या इमारतीत कोणीही वास्तव करीत नसल्याने जीवितहानी झाली नाही. फटाक्याच्या ठिणगीमुळे ही आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. मुरूड बाजारपेठेतील बँक ऑफ महाराष्ट्र आणि साई मेडीकल यांच्यामध्ये असलेल्या इमारतीत कोणीही वास्तव करीत नाही, मात्र इमारतीच्या मालकाने एका विक्रेत्याला भाजी व फळे विकण्याची परवानगी दिली होती. विक्रेते पाटील नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री उरलेली भाजी व फळे इमारतीच्या तळमजल्याच्या हॉलमध्ये ठेवूनन घरी गेले होते. रात्री 10.30च्या सुमारास या इमारतीला आग लागल्याचे शेजारी राहणार्यांच्या लक्षात आले. त्यांनी नगर परिषद कर्मचार्यांंना फोन करून या आगीची खबर दिली. ते दोघे तत्काळ अग्निशमन दलाची गाडी घेऊन घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी नागरिकांच्या सहाय्याने आगीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. दोन तासांनंतर आग नियंत्रणात आली. आगीत भाजी व फळे व इतर सामान भस्मसात झाले.
RamPrahar – The Panvel Daily Paper