पेण : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावर बेकायदा गुरांची वाहतूक करणार्या अज्ञात व्यक्तींविरोधात वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांकडून मोठ्या गाड्यांची तपासणी करण्यात येत असल्याने या महाभागांनी चक्क कारमधून दोन गाई व दोन बैलांची तस्करी करण्याचा प्रताप केला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरून नागोठणे बाजूकडे जाणार्या एमएच 04 बीडब्ल्यु 6813 या क्रमांकाच्या कारने गडब गावाजवळ सकाळी 6च्या सुमारास एका टेम्पोला पाठीमागून धडक दिली. त्यामुळे टेम्पो बंद पडल्याने अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी ग्रामस्थ जमा झाले. या वेळी कारमधील चार व्यक्तींनी तेथून पळ काढला. या कारमध्ये दोन गाई व दोन बैल गुंगी दिलेल्या अवस्थेत आढळून आले. या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात चार अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper