सोलापुरात शिंदे समर्थकांची नारेबाजी
सोलापूर ः प्रतिनिधी
महाविकास आघाडीच्या सोलापुरात झालेल्या बैठकीतील बॅनरवर ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा फोटो नसल्याचे दिसून आले. यावरून आघाडीतील बेबनाव पुन्हा एकदा समोर आला, तर शिंदे समर्थकांनी या वेळी जोरदार नारेबाजी करीत निषेध नोंदवला.
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ महाविकास आघडीची बैठक रविवारी (दि. 22) सोलापुरात झाली. बैठकीला जलसंपदामंत्री जयंत पाटील, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री सतेज पाटील, दत्तात्रय भरणे, डॉ. विश्वजित कदम उपस्थित होते.
या वेळी बॅनरवर माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा फोटो नसल्यामुळे शिंदे समर्थकांनी गोंधळ घातला. सोलापूर हा विद्यमान आमदार प्रणिती शिंदेंचा मतदारसंघ आहे. त्यांचा फोटो असणे अपेक्षित होते, मात्र दोघांपैकी एकाचाही फोटो नसल्याने समर्थकांनी नारेबाजी केली.