Breaking News

दिलासादायक! पोलीस मृत्यूचे प्रमाण शून्यावर; नवी मुंबईत कोरोनाबाधित 13 पोलीस उपचाराधीन

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

एक हजारांच्यावर गेलेली नवी मुंबई पोलीस दलातील कोरोनाबाधितांची संख्या आता नियंत्रणात आली आहे. पोलीस दलातील मृत्यूचे प्रमाण गेले दोन महिने शून्यावर आहे. तर सप्टेंबरमध्ये 500हून अधिक असलेली उपचाराधीन रुग्णांची संख्या आता 13वर आली आहे. कुटुंबीयांपैकी नऊ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. देशात 23 मार्चपासून लागू झालेल्या टाळेबंदीचा सर्वाधिक ताण पोलिसांवर होता. घरी राहण्याच्या नियमाची अंमलबजावणी पोलिसांना रस्त्यावर उतरून करावी लागली. सुरुवातीला बाधितांची संख्या मर्यादित असली तरी संसर्ग पसरू नये, यासाठी नागरिकांना ‘स्व-अलगीकरणात’ ठेवण्याची मुख्य जबाबदारी पोलिसांनीच पार पाडली. त्यामुळे पोलीस व कुटुंबीयांमध्येही कोरोना संसर्ग पसरला. या काळात कोरोनाबाधित पोलीस व त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबीयांची विशेष काळजी घेतली ती नवी मुंबई पोलीस दलाने निर्माण केलेल्या तंदुरुस्ती पथकाने. त्यामुळे प्रादुर्भावही नियंत्रणात राहिला. आतापर्यंत नवी मुंबई पोलीस दलातील 134 अधिकारी, 931 कर्मचारी व कुटुंबीयांपैकी 619 जण असे 1684 कोरोनाबाधित झाले. 11 जणांचा मृत्यू झाला आहे. सप्टेंबरमध्ये यापैकी 500हून अधिक जण उपचार घेत होते. मात्र त्यानंतर पोलिसांच्या तंदुरुस्त पथकाने घेतलेली काळजी व वैद्यकीय उपचार यामुळे आक्टोबरमध्ये केवळ 26 जण उपचार घेत होते. त्यानंतर ही संख्या आणखी कमी झाली असून आता फक्त 13 जणांवर उपचार सुरू आहेत, तर गेल्या दोन महिन्यांत एकाचाही मृत्यू झालेला नाही. पोलीस दलातील रुग्णसंख्या कमी झाली असली तरी तंदुरुस्ती पथक दक्ष आहे. गाफील न राहण्याच्या सूचना आयुक्त बिपीनकुमार यांच्याकडून वारंवार मिळत आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात कोरोनाबाबत चौकशी केली जात आहे. गुरुवारी उपायुक्त कार्यालयातील दोन जण संशयित आढळल्याने त्यांना विलगीकरणात पाठविण्यात आले.

पोलीस दलातील कोरोना प्रादुर्भाव कमी झाला असून लवकरच तो शून्यावर येईल अशी आशा आहे. मात्र पुन्हा संसर्ग होणार नाही, असेही नाही. त्यामुळे आम्ही कायम दक्ष आहोत.

-सुरेश मेंगडे, उपायुक्त, परिमंडळ एक

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply