पोलादपूर : प्रतिनिधी
मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील धामणदिवी गावाच्या हद्दीतील एका तीव्र वळणावर चालाकाचा ताबा सुटल्याने ओमनी व्हॅन 100 फूट खोल दरीमध्ये कोसळली. सुदैवाने व्हॅनमधील चारही प्रवासी बचावले आहेत.
चालक गणेश पर्वती गाडे (वय 35) हा त्याच्या ताब्यातील ओमनी व्हॅन (एमएच-12,क्यूएफ-9338) घेऊन शुक्रवारी (दि. 18) सायंकाळी खेड येथून पोलादपूरमार्गे भोर येथे जात होता. पोलादपूर तालुक्यातील धामणदेवी गावाच्या हद्दीत एका तीव्र वळणउतारावर चालक गणेश गाडे याचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी रस्त्याच्या बाजूला 100 फूट खोल दरीमध्ये कोसळली. या अपघातात चालक गणेश पर्वती गाडे याच्यासह विशाल नंदू वरुते (वय 24) किरकोळ जखमी झाले तर तुषार नंदू वरुते (वय 20) आणि अजिंक्य नंदू वरुते (वय 19, सर्व रा. कापूरहोळ, ता. भोर) यांना किरकोळ मुकामार लागला आहे.
अपघाताची खबर मिळताच पोलीस उपनिरिक्षक चांदणे, हवालदार जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व प्रवाशांना दरीतून सुखरूप बाहेर काढून, अपघातस्थळाचा पंचनामा केला. या अपघाताची नोंद पोलादपुर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अधिक तपास हवालदार जाधव करीत आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper