Breaking News

पर्यटकांनी समुद्रकिनारे गजबजले!

संचार बंदी दूर होताच मुरुड येथील काशीद व मुरुड समुद्र किनारी हजारो पर्यटकांची गर्दी उसळत आहे.मुंबई पासून 165 किलोमीटरवर मुरुड हे पर्यटन स्थळ असल्याने मुंबई, ठाणे, बोरिवली, कल्याण, डोम्बवली, विरार येथील सर्वाधिक पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत.मुरुड तालुक्यात विविध पर्यटन स्थळे आहेत.या विविध ठिकाणी पर्यटक आवर्जून भेटी देऊन पर्यटनाचा आनंद लुटत आहेत.

सुप्रसिद्ध ऐतिहासिक जंजिरा किल्ला हा 22 एकर परिसरात व 22 बुरुज असलेला हा महाकाय किल्ला पर्यटकांना मोठा आकर्षण ठरला आहे.या किल्ल्यास दरवर्षी पर्यटक लाखोंच्या संख्येने भेट देत असतात.किल्ल्यात जाण्यासाठी जंजिरा पर्यटक सोसायटी या संस्थेस महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाकडून परवाना देण्यात आला आहे.या संस्थेच्या 13 शिडांच्या बोटी असून यामधून पर्यटक ये-जा करीत असतात.त्याच प्रमाणे खोरा बंदरातून सुद्धा किल्यात ने-आण केली जात असते.दिघी बंदरातून सुद्धा जंजिरा किल्ल्यावर पर्यट्कां आणले जाते.चारही बाजूला समुद्र मध्यभागी हा किल्ला पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र ठरला आहे.

काशीद समुद्र किनारा हे सुद्धा पर्यटकांचे आकर्षणाचे स्थान आहे.निळेक्षार पाणी,पांढरी शुभ वाळू,समुद्र किनार्‍या भोवती दाट सुरुंच्या झाडाची गर्दी असल्याने या ठिकाणी इतर ठिकाणापेक्षा सर्वात जास्त पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात.काशीद हे आंतरराष्ट्रीय स्थळ असल्याने विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येऊन येथे वस्ती केल्याने स्थानिकांना मोठा स्वयंरोजगार मिळून त्यांचा आर्थिक स्थर उंचावण्यास मदत झाली आहे.

शनिवार रविवारी मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी येत असून गर्दीचे नवं नवीन विक्रम प्रस्थापित करीत असतात. या ठिकाणी उंट स्वारी,वाळूवर चालणार्‍या गाड्या, घोडेस्वारी, वॉटर स्पोर्ट असे विविध करमणूक प्रदान सोयी प्राप्त आहेत.

मुरुड तालुक्यातील सुपेगाव परिसरात फणसाड अभयारण्याचा विस्तार झालेला असून सुमारे 54 चौरस किलोमीटर क्षेत्रात या अभयारण्याचे क्षेत्र व्याप्त  असून मुरुड ,रोहा व अलिबाग च्या सीमा रेषेचा हि समावेश यामध्ये होत आहे.रायगड जिल्ह्यातील कोकण किनारपट्टीवर हिरव्यागार झाडाच्या कुशीत वसलेले एक घनदाट जंगल अर्थात फणसाड अभयारण्य होय. मुंबईपासून 160 किलोमीटर अंतरावर पनवेल पेण व अलिबाग मार्गावर विस्तीर्ण असे फणसाड अभयारण्य म्हणजे निसर्गाचे एक वरदान आहे. विस्तीर्ण अश्या या अभयारण्यात साग व निलगिरीची उंच अशी भली मोठी झाडे असल्याने कडक अश्या उन्हात हि दाट सावली या भागात आढळून येते. ऐन, किंजल, जांभूळ, हेड, कुडा, गेळ, अंजली, कांचन, सावर  याचबरोबर सीताअशोक, सर्पगंधा, रानतुळस, कुर्डू, कडीपत्ता, उक्षी ॠया औषधी वनस्पती सुद्धा या ठिकाणी आढळून तेलात.

   जगातील सर्वात लांब असलेल्या वेली  पैकी एक असलेली गारंबीची वेल या ठिकाणी आढळून येते.90 प्रकारची फुलपाखरे येथे बागडताना दिसतात. फुलपाखरामध्ये ब्लु मारगोन, मॅप,कॉमन नवाब अश्या वैशीष्ठपूर्ण जाती आढळून येतात.

  पक्षाच्या 164 प्रजाती या ठिकाणी आढळतात. घुबड, तुरेवाला सर्पगरुड,ससाणा, सफेद पाठीची गिधाडे, सातभाई, बुलबुल, हळद्या तांबट, खंड्या, खाटीक, सुभग, नीलपंख, स्वर्गीय नर्तक, सुतार, महाराष्ट्राचे मानचिन्ह असलेले हरियाल, कोकीळ या सारखे रंगीबेरंगी पक्षी येथे वास्तव्यास आहेत.

फणसाड अभयारण्यात रानससा, सांबर, भेकर, पिसोरी, साळींदर, त्रास, रानडुक्कर, मुंगूस, कोल्हा, माकड, रानमांजर, बिबट्या आदी वन्यजीव मोठ्या संख्येने आहेत.पर्यटकांचे व अभ्यासकांचे आकर्षण असलेले शेकरू (मोठी खार) सुद्धा येथे आहे. या ठिकणी सुद्धा शस्त्रद्न्य व मुंबई तील पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. मुरूड तालुक्यातील वावडुंगी ग्रामपंचायत हद्दीतील  सुप्रसिद्ध असलेला सवतकडा  येथील धबधबा पर्यटकांचे व स्थानिकांचे खास आकर्षण ठरत आहेत. उंच असा धबधबा व त्यातून उडणारे तुषार हे पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे.

निसर्गसौंदर्याची खाण म्हणून ओळखल्या जाणार्या मुरूड तालुक्याला प्रतिवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. फेसाळणारे धबधबे, धुक्याच्या पाठशिवणीत व वार्याच्या लहरीवर झोकावणारे धुके, पावसाची रिपरिप, गार वारा, थंडी व ओलेचिंब भिजवणारा पाऊस, घाट व डोंगरातून अनेक ठिकाणी पाण्याच्या ओझरणार्या रांगा, उंचच उंच डोंगरावर धुक्यातील झालरीतून दिसणारी हिरवाई अशा सगळ्या रोमांचकारी क्षणांना अनुभवण्यास पर्यटकांना सवत कडा हे ठिकाण आवडीचे झाले आहे.

गारंबी धरण हे सुद्धा पर्यटकांना नेहमीच पसंतीचे ठिकाण आहे. मुरुड पासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर जंगल भागातील हे ठिकाण आहे.नवाब सरकारने मुरुड शहरातील लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी सदरील धरण बांधले होते.

येथे सतत वाहणारा झरा असून झर्‍याचे पाणी नेहमीच कोसळत असल्याने पर्यटकांना येथे स्नान करणे खूप आवडत आहे. निरर्गरम्य असे हे ठिकाण असून येथे सुद्धा पर्यटकांचा ओघ कायम आहे. डिसेम्बर महिन्यापासून पर्यटकांची संख्या वाढली असून पर्यटकांची या ठिकाणी सतत वर्दळ सुरु आहे.

सध्या पर्यटकांच्या आगमनामुळे मुरुड तालुका पर्यटकांनी हौउसफूल झाला असून लॉजिंग हॉटेल व अल्पोपहार स्टॉल यांचे व्यवसाय चांगले सुरु आहेत.पर्यटकांच्या आगमनामुळे स्थानिकांना मोठा स्वयंरोजगार प्राप्त झाला असून क्रयशक्ती वृद्धीगंत होण्यास मदत होत असल्याने येथील राहणीमानाचा दर्जा उंचावत आहे. मुरुड तालुक्यातील विविध पर्यटनस्थळावर पर्यटकांची मोठी गर्दी दिसत आहे. समुद्र किनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत.

-संजय करडे, खबरबात

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply