कोण कोठला शरजील उस्मानी नावाचा एक फाटका तरुण पुण्यात येतो आणि समस्त हिंदू समाजाबद्दल विषारी गरळ ओकून जातो. तरीही सरकार मुर्दाडासारखे गप्प बसून राहते. हा सारा प्रकार आहे तरी काय? शरजील उस्मानी याची हिंदूविरोधी गरळ जितकी राजकीय आहे, तितकेच महाराष्ट्राच्या सरकारचे गप्प बसणे देखील राजकीय आहे.
बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक वीण असलेल्या भारतीय समाजात अनेक प्रकारचे अंत:प्रवाह चालू असतात. अठरापगड वस्ती असलेल्या शहर भागांमध्ये तर थोड्याफार धुसफुशी, हेवेदावे किंवा भांडणे ही होतच असतात. त्याला फारसे मनावर घ्यायचे नसते. परंतु अशा किरकोळ कुरबुरींमध्ये जेव्हा कुटिल राजकारणाचे विष कालवले जाते, तेव्हा धार्मिक किंवा जातीय तेढीचा भस्मासुर जागा होतो. एकमेकां साह्य करु, अवघे धरू सुपंथ या सुभाषितानुसार शतकानुशतके आणि पिढ्यानपिढ्या आपल्या देशातील गावगाडा चालू होता. धार्मिक आणि जातीय हिंसाचाराला तेथे फारसे स्थान नव्हते. कारण राजकारणाची विषवल्ली तेव्हा इतकी पसरलीच नव्हती. आता मात्र सारा भारतीय समाज नाजूक काळातून जात आहे. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचा शरजील उस्मानी हा एक माजी विद्यार्थी. या पलीकडे त्याला दुसरी ओळखही नाही आणि पात्रता तर अजिबातच नाही. हिंदूविरोधी जहरी भाषणे ठोकणे यापलीकडे त्याला उद्योगही नाही. अशा तरुणाने पुण्यात येऊन भर व्यासपीठावरून हिंदू समाजाबद्दल बेताल बडबड केली. त्याला व्यासपीठ मिळवून दिले ते एल्गार परिषदेने. वास्तविक एल्गार परिषदेचा पूर्वानुभव चांगला नाही, तरीही ही परिषद भरविण्यास तीन पक्षांच्या ठाकरे सरकारने निमूटपणे परवानगी दिली. परवानगी दिली हे एकवेळ समजून घेण्याजोगे आहे. परंतु 30 जानेवारी रोजी या परिषदेच्या व्यासपीठावर शरजील उस्मानी याने केलेली बेताल बडबड समाजमाध्यमांमध्ये वणव्यासारखी पसरली. अशाप्रकारची वक्तव्ये या देशात किंवा महाराष्ट्रात काय हाहाकार घडवून आणतात याची कल्पना ठाकरे सरकारला नव्हती, असे म्हणायचे का? आश्चर्याची बाब म्हणजे, इतके जहरी भाषण करून शरजील उस्मानी राजरोसपणे आपल्या घरी निघून देखील गेला, आणि आपले प्रशासन आणि हिंदुत्वाचा सोयीस्कर पुळका आणणारे ठाकरे सरकार दोघेही गाढ झोपेत होते. एकीकडे हिंदुत्वाचा बुलंद पुकारा करायचा, अयोध्या-अयोध्या असा आरडाओरडा करून फुकटचे श्रेय लाटायचे आणि दुसरीकडे शरजील उस्मानीसारख्या हिंदुद्वेष्ट्यांना मोकळे सोडायचे, हे कुठल्या थराचे राजकारण आहे? आयुष्यभर ज्यांना विरोध केला त्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेच्या खुर्चीची ऊब अनुभवणार्या शिवसेनेची ही हतबलता आणखी किती खालच्या थराला जाणार आहे. शरजील उस्मानी याच्यावर तात्काळ कारवाई करून त्याला अटक करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावून धरली आहे. शरजील उस्मानीला अटक न झाल्यास भारतीय जनता पक्षातर्फे राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा देखील फडणवीस यांनी दिला आहे. यासंदर्भात फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सडेतोड पत्र लिहून सरकारचे लक्ष वेधले आहे. आता ठाकरे सरकार लवकरच आपल्यामधील हिंदुत्वाला जागून कारवाई करते की राजकीय हतबलतेपोटी डोळ्यावर कातडे ओढून गप्प बसते हे येणारा काळच सांगेल. शरजील उस्मानीसारखे समाजकंटक महाराष्ट्राच्या भूमीत येऊन विषाची पेरणी करून जातात. त्यांचे एवढे धाडस होते हीच खरी लांच्छनास्पद बाब आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper