नवी मुंबई ः प्रतिनिधी
दर रविवारी बाजार समितीला कार्यालयीन सुटी असते. त्यानुसार बाजार समितीच्या आवारातील पाचही बाजार या दिवशी बंद असतात, मात्र आता हापूस आंब्याचा हंगाम सुरू होत आहे. रविवारीही आंब्याच्या गाड्या बाजारात येत असतात. बाजार आवार बंद असल्याने या गाड्या बाजाराबाहेर उभ्या कराव्या लागतात. त्यामुळे बाजार समितीला मिळणारा सेसही बुडतो, मात्र आता फळांवरील नियमन हटविल्याने हा आंबा थेट मुंबईच्या किरकोळ बाजारात जाऊ शकतो. परिणामी यापुढे दर रविवारी अर्धा दिवस बाजार सुरू राहणार आहे. बाजार समितीने या संदर्भातील निर्णय घेतला आहे.
रविवार म्हटला की बाजार समितीला सुटी हे गणित पूर्वीपासून ठरलेले आहे, मात्र आता बाजाराच्या कल्पना बदलत आहेत. कृषी कायद्यात बदल होत असल्याने बाजारात व्यापार करण्याच्या पद्धती बदलत आहेत. त्यामुळे या बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी बाजार समितीनेही आपल्या नियमात बदल करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे दर रविवारी फळबाजार आवार सुरू ठेवला जाणार आहे. बाजारात येणार्या मालावरील सेस मिळावा यासाठी सेस वसुलीसाठी कार्यालय सुरू ठेवले जाणार आहे. तशा सूचना व्यापारी संघटना आणि व्यापार्यांना बाजार समितीने दिल्या आहेत.
आता हापूसचा हंगाम सुरू होत आहे. यात व्यापार्यांना चांगला व्यापार करता येतो. यामुळे बाजार समितीलाही चांगला महसूल मिळतो, मात्र आता बाजार समितीच्या आवारात कृषिमाल न आणता थेट किरकोळ बाजारात विकण्याची मुभा सरकारने दिल्याने बाजार समितीमध्ये येणारा बहुतांश कृषिमाल थेट किरकोळ बाजारात जात असतो. आता आंब्याबाबत हेच झाल्यास आंब्याच्या बाजारातील व्यापार कमी होऊ शकतो. त्यामुळे काही व्यापार्यांनी बाजार समितीकडे या संदर्भात मागणी केली होती. त्यानुसार रविवारीही बाजार सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आल्याचे फळबाजाराचे सहसचिव ईश्वर मसराम यांनी सांगितले.
RamPrahar – The Panvel Daily Paper