माणगाव : प्रतिनिधी
नगरपंचायत स्थापन होऊन पाच वर्षे लोटली, तरीही नगरपंचायतीने मच्छी मार्केट उभारले नाही. वास्तविक नगर पंचायतीच्या जागेत स्वतंत्र मच्छी मार्केट उभारण्याची गरज होती. माणगावात यापूर्वी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत मच्छी विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली होती. मात्र कोणतीही परवानगी न घेता उभारलेली त्यांची अतिक्रमणे महामार्ग प्राधिकरण अधिकार्यांनी शनिवारी (दि. 6) जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केली. त्यामुळे येथील मच्छी विक्रेते उघड्यावर आले. त्यातच नगरपंचायतीने पाठ फिरविल्याने माणगावातील मच्छी मार्केटचा प्रश्न अधिकच गंभीर बनला असून त्याचा फटका सर्वांनाच बसत आहे. माणगाव नगर पंचायत 2014 -15मध्ये अस्तित्वात आली. त्यावेळी नगरपंचायतीमुळे शहराचा विकास होईल, विविध विकास कामे होतील अशी नागरिकांना आशा वाटत होती. शहरात स्वतंत्र भाजी मार्केट, मच्छी मार्केट उभारले जाईल, पाण्याचे नियोजन होईल व नागरी समस्या दूर होतील, असे नागरिकांना वाटत होते. मात्र नगरपंचायतीने त्याकडे कानडोळा केला. नगरपंचायतीने वेळीच लक्ष न दिल्याने माणगावातील मच्छी विक्रेते आज रस्त्यावर आले आहेत. नगरपंचायत स्थापन झाल्यापासून येथील प्रत्येक मच्छी विक्रेत्यांकडून दररोज वीस रुपयांप्रमाणे कर वसूल केला जातो. आतापर्यत वसूल केलेल्या कराच्या रकमेतून स्वतंत्र मच्छी मार्केट बांधता आले असते, अशी चर्चा माणगावात आहे. माणगावातील अतिक्रमणे हटविलेल्या ठिकाणी सध्या काही मच्छी विक्रेते व्यवसाय करतात, तर मोर्बा रस्त्यावरील उपजिल्हा रुग्णालयासमोर तसेच निजामपूर रोड, कचेरी रोड गार्डनजवळ काही मच्छी विक्रेते व्यवसाय करतात. या वेगवेगळ्या जागेत बसणार्या सर्व मच्छी विक्रेत्यांना नगरपंचायतीने स्वतंत्र मच्छी मार्केट बांधून दिल्यास त्यांचा कायमचा प्रश्न सुटेल, अशी नागरिकांना अपेक्षा आहे.
नाना नानी पार्क व इतर अपयशी योजनांवर नगरपंचायतीने लाखो रुपये खर्च केले. मात्र मच्छी मार्केट, व भाजी मार्केट तसेच पार्किंग या सारख्या मूलभूत सोयी करता आल्या नाहीत. मच्छी विक्रेत्यांची कुटुंबे आज उघड्यावर आली आहेत. त्यांची नगरपंचायतीने ताबडतोब सोय करावी.
-योगेश सुळे, सरचिटणीस, माणगाव तालुका भाजप
माणगावात मच्छी व भाजी मार्केट उभारणीची गरज असून त्यासाठी किमान 20 ते 25 गुंठे जागेची आवश्यकता आहे. मार्केटसाठी नगरपंचायतीच्या जागेचा शोध घेण्यात येत आहे.
-प्रशाली जाधव दिघावकर, प्रांताधिकारी तथा प्रशासक माणगाव नगरपंचायत