महावितरणचा अजब कारभार
धाटाव : प्रतिनिधी
रोहा तालुक्यातील धाटाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी वीज गायब होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. महावितरणने या भागात अखंडित वीजपुरवठा करावा, अशी मागणी ग्राहकांमधून केली जात आहे.
महावितरणने आधीच वाढीव वीज बिले देऊन सामान्य ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. बिले भरूनदेखील वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. धाटाव परिसरातील मुख्यतः महादेववाडी, लाढंर, तळाघर, बोरघर, मळंखडवाडी, वाशीसह अनेक गावांतील वीज गेल्या दोन-तीन दिवसांपासून रात्रीच्या वेळी तासन्तास गायब होत आहे. त्यामुळे तेथील ग्रामस्थ हैराण झाले आहेत. वादळवारा, पाऊस नसतानाही वीज वारंवार गायब होत असल्याने ऑनलाइन शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांनी शिकावे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे, तसेच विभागातील छोट्या मोठ्या उद्योगधंद्यांना याचा मोठा फटका बसत आहे.
महावितरणने हा भोंगळ कारभार थांबवून लवकरात लवकर अखंडित विद्युत पुरवठा सुरू करावा, अशी मागणी ग्राहकांमधून केली जात आहे.