महाड भाजपची मागणी
महाड ः प्रतिनिधी
महाडचे आराध्यदैवत श्री विरेश्वर महाराज यांचा छबिनोत्सव आणि देशाचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती तसेच गावागावांतील सर्व धार्मिक कार्यक्रमांना बिनशर्त परवानगी द्यावी, अशी मागणी महाड भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत शुक्रवारी (दि. 12) तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.
महाडचे आराध्यदैवत श्री विरेश्वर महाराज यांचा छबिनोत्सव ही महाडची ऐतिहासिक परंपरा आहे, तसेच याला पर्यटनाची जोडदेखील आहे. महाडमधील कोरोनाचा कमी झालेला प्रादुर्भाव पाहता महाडकरांच्या भावनांचा विचार करीत या छबिनोत्सव तसेच तालुक्यात मोठ्या प्रमाणात साजर्या होणार्या शिवजयंती उत्सव, चवदार तळे संग्राम, शिमगोत्सव, गावागावांतील जत्रा ऊरुस यांना शासनाने आता यापुढे बिनशर्त परवानगी द्यावी, अशी मागणी महाड भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.
शुक्रवारी दुपारी भाजप जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर यांच्या वतीने महाड तहसीलदार सुरेश काशिद यांना सदर निवेदन सादर करण्यात आले. या वेळी तालुकाध्यक्ष जयवंत दळवी, उपजिल्हाध्यक्ष अक्षय ताडफळे, कार्यकारिणी सदस्य संदीप ठोंबरे, तालुका सरचिटणीस महेश शिंदे, अनिल मोरे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper