Breaking News

सचिन वाझेंच्या मुसक्या आवळल्या; एनआयएची कारवाई; 11 दिवसांची कोठडी

मुंबई ः प्रतिनिधी

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ गाडीत आढळलेली स्फोटके आणि या गाडीमालकाचा झालेल्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी 13 तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शनिवारी रात्री (दि. 13) अटक केली. त्यांनीच अंबानींच्या घराजवळ गाडी उभी केली होती, असा आरोप आहे. दरम्यान, न्यायालयाने वाझे यांची 11 दिवसांच्या एएनआय कोठडीत रवानगी केली आहे. अंबानी यांच्या अँटिलिया घराबाहेर स्फोटके आणि धमकीचे पत्र असलेली स्कॉर्पिओ कार सापडल्यानंतर या प्रकरणाचा तपास वाझे यांच्याकडे सोपविण्यात आला होता, मात्र या कारचे मालक व्यापारी मनसुख हिरेन यांचा मृत्यू झाला आणि वाझे संशयाच्या भोवर्‍यात सापडले. या प्रकरणी विरोधी पक्ष भाजपने त्यांचे निलंबन करून अटकेची मागणी केली होती. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा तपास राज्य दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) सोपविला होता, तर एनआयए समांतर तपास करीत आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात एटीएस पथक अटक करू शकेल अशी शक्यता असल्याने वाझे यांनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. या अर्जावर निकाल होईपर्यंत अटक करू नये, अशी मागणी त्यात होती, मात्र हे प्रकरण गंभीर असून वाझे यांना अटक करून कोठडीतील चौकशी आवश्यक आहे, असा युक्तिवाद करीत एटीएसने या अर्जास विरोध केला होता. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून तपास यंत्रणेकडे वाझे यांच्याविरोधात प्राथमिक पुरावे असल्याने त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन देता येणार नाही, असे सांगत याचिका फेटाळून लावली. त्यानंतर एनआयएने वाझेंचा जबाब नोंदवला होता. तब्बल 13 तास चाललेल्या चौकशीनंतर एनआयएने वाझे यांना अटक केली. भादंवि कलम 286, 465, 473, 506(2), 120 बी आणि 4 (ए)(बी)(आय) स्फोटक वस्तू कलम 1908 अंतर्गत वाझेंना अटक करण्यात आली आहे. त्यांना रविवारी (दि. 14) सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात सुटीकालीन खंडपीठासमोर हजर करण्यात आले. या वेळी कोर्टाने वाझेंना 25 मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. दरम्यान, स्फोटके आढळलेल्या कारचे कनेक्शन इंडियन मुजाहिदीनसोबत असल्याचे वृत्त होते, मात्र या प्रकरणात दहशतवादी अँगल नसल्याची माहिती समोर आली आहे. टेलिग्रामवरील मेसेज हा खोडसाळपणा आहे, असे दिल्ली स्पेशल सेलने एनआयएला स्पष्ट करून जैश-उल-हिंद नावाच्या कोणत्याही संघटनेचा यात सहभाग नसल्याचेही सांगितले आहे.

आणखी काही पोलीस अधिकारी रडारवर

मुंबईत पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर वाझे यांचे जवळचे पोलीस निरीक्षक रियाज काझी यांना एनआयएने ताब्यात घेतले आहे. यानंतर आणखी एका अधिकार्‍यालाही ताब्यात घेतले जाऊ शकते. याशिवाय दोन चालकांचीही चौकशी एआयएकडून सुरू आहे. एनआयएकडून एका पोलीस उपायुक्तांची चौकशी होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

‘ती’ कार मुंबई पोलिसांचीच

मुंबई ः एनआयएने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली आणि अनेक गोष्टी हळूहळू उलगडू लागल्या आहेत. एनआयएने जी इनोव्हा गाडी रात्री ताब्यात घेतली ती गाडी अँटिलियाजवळ दिसली होती. हीच गाडी पोलीस मुख्यालयातदेखील दिसून आली होती. ही इनोव्हा गाडी सीआययू म्हणजे क्राइम इंटेलिजन्स युनिटची असल्याचे समोर आले आहे. याच गाडीचा वापर सचिन वाझे आणि त्यांची टीम करीत होती. विशेष बाब म्हणजे घटनेनंतर या इनोव्हाला पोलिसांच्या मोटर ट्रान्सपोर्ट विभागात रिपेअरिंगसाठी पाठवले होते. म्हणजे एका उद्देशाने ही कार पोलिसांच्या मोटर ट्रान्सपोर्ट विभागात रिपेरिंगसाठी पाठवण्यात आली होती, जेणेकरून ही गाडी कुणाच्या नजरेत येऊ नये. या सर्व गोष्टींचा खुलासा झाल्यानंतर अनेकांवर कारवाईचा फास आवळला जाण्याची शक्यता आहे.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply