Breaking News

चिमुरडीच्या अपहरणकर्त्यांना बेड्या; दोन महिलांचा समावेश

उरण ः प्रतिनिधी

उरण तालुक्यातील नवघर गावातील एका घरातून पळवून नेलेल्या दोन महिन्यांच्या चिमुरडीला उरण पोलिसांनी मोठ्या शिताफीने शोधून काढण्यात यश मिळविले आहे. या प्रकरणी दोन संशयित महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

उरण तालुक्यातील नवघरपाडा येथे वास्तव्यास असलेल्या मनोज राजभर यांचा फुलेहारांचा व्यवसाय आहे. सकाळच्या सुमारास व्यवसायात मग्न असलेल्या राजभर दाम्पत्याची दोन महिन्यांची मुलगी बाजूलाच पहुडली होती. दरम्यान, राजभर दाम्पत्याच्या दुकानाजवळ एक रिक्षा येऊन थांबली. त्या रिक्षातून उतरलेल्या एका बुरखाधारी महिलेने राजभर दाम्पत्याची नजर चुकवून दोन महिन्यांच्या मुलीला घेऊन रिक्षातून पलायन केले.

बर्‍याच वेळानंतर दाम्पत्याला मुलगी आढळून आली नाही. त्यामुळे त्यांनी परिसरात शोध घेतला, मात्र काहीही निष्पन्न झाले नाही. अखेर मुलीच्या आईवडिलांनी उरण पोलिसांना वर्दी दिली. उरण पोलिसांनीही तत्परता दाखवत मिळालेल्या माहितीच्या आधारे अज्ञात रिक्षावाला आणि चॉकलेटी ड्रेस घातलेल्या बुरखाधारी महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली.

स्थानिक रिक्षावाल्यास भाड्याव्यतिरिक्त या प्रकरणाची काहीही माहिती नव्हती. मुलीला पळवून नेल्याचे समजताच रिक्षावाल्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांना आरोपींपर्यंत पोहचणे सहज शक्य झाले. अखेर उरणच्या पोलीस पथकाने दोन महिन्यांच्या मुलीला आरोपींसह पनवेलच्या खांदेश्वर परिसरातून शोधून काढण्यात यश मिळवून आईवडिलांच्या स्वाधीन केले.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply