दुबई ः वृत्तसंस्था
आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहलीने पहिले स्थान कायम राखले आहे, तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह गोलंदाजांच्या क्रमवारीत चौथ्या स्थानावर घसरला आहे. भारताचा मर्यादित षटकांचा उपकर्णधार रोहित शर्मा तिसर्या क्रमांकावर असून, तो पाकिस्तानच्या बाबर आजमच्या मागे आहे, तर के. एल. राहुलने 31व्या स्थानावरुन 27व्या स्थानावर झेप घेतली आहे. अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट 42वे स्थान मिळवले असून, ऋषभ पंतने पहिल्या 100 फलंदाजांमध्ये मध्ये प्रवेश केला आहे. इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेमधून विश्रांती घेतलेला बुमराह गोलंदाजांमध्ये चौथ्या स्थानावर घसरला आहे. भुवनेश्वर कुमारने 11व्या स्थानी उडी घेतली आहे. पालघर एक्स्प्रेस म्हणून ओळखला जाणारा शार्दुल ठाकूर 80व्या स्थानी पोहोचला आहे.
टी-20 क्रमवारी : फलंदाजांच्या टी-20 क्रमवारीत राहुल आणि कोहली अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानी आहेत. अष्टपैलू व गोलंदाजांच्या क्रमवारीत एकही भारतीय खेळाडू 10मध्ये नाही.
कसोटी क्रमवारी : कसोटी क्रमवारीत रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सनंतर दुसरे स्थान कायम राखले आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजा तिसर्या, तर अश्विन चौथ्या क्रमांकावर आहे.