झाडांना नवीन पालवी फुटू लागली की सर्वांना वसंत ऋतुची आठवण होते. बहुतेक सर्व प्रकारच्या झाडांना वसंत ऋतूमध्ये नवीन पालवी फुटलेली आढळून येते आणि आपोआप आपल्या तोंडात ‘ऋतू हिरवा… ऋतू बरवा‘ असे शब्द घोळू लागतात. यावर्षी चैत्र महिना थोडा उशिरा सुरू होतोय आणि त्यामुळे यावर्षी एप्रिल महिन्यात झाडे नव्या रंगाने न्हाऊन निघालेली दिसून येताहेत. सध्या हिरवीगार झाडे नवीन पालवी अंगावर लेवून पोपटी रंगात न्हाऊन निघालेली पहायला मिळत असून, डोक्यावर आलेला सूर्य आग ओकत असताना झाडांना फुटलेला नवी पालवी आयुष्यात नवी उमेद घेऊन आल्यासारखी वाटते.
साधारण फेब्रुवारी महिन्याच्या मध्यात वातावरणातली बोचरी थंडी काढता पाय घेऊ लागते. डोक्यावर धुक्याची चादर पांघरलेले एखाद्या नदीच्या किंवा तलाव परिसरातील दृश्य मनात रोमांच उभे करते. त्यावेळी फुलपाखरांची झुंबरं हळूहळू गायब होण्याच्या मार्गाला लागतात. वातावरणात बदल होताना दिसून येतो.
शिशिरात निष्पर्ण झालेल्या फांद्यांवर तांबूस-गुलाबी पाना-फुलांचे डोळे लकाकू लागतात. आंबे मोहरतात. फणस सर्वांगावर कुयर्या घेऊन लेकुरवाळा होतो. झाडांवर हिरवे लटकलेले काजू शोभून दिसतात.लिंबू, पपनसांचा मंद सुगंध, रातराणी, जाई-जुई-मोगरा-मदनबाण यांच्या सुवासात वेगळेपणाने मिरवू लागतो.सुरंगीचा चकचकीत हिरवा वृक्ष नखाएवढ्या कळ्यांनी व सुगंधाने अंगोपांगी मोहरतो. मोठ्या चेंडूएवढी बेलफळे वार्यावर डोलू लागतात. जाम, कमळ आणि कुमुदिनीच्या फुलांवर मधमाशा घोंगावू लागतात. लाल – काळ्या, आंबट -गोड चिमुकल्या लांबट फळांची तुतीची झाडे पक्षांना साद घालू लागतात. डोंगरांवर पळस, पांगारा, सावर यांची लाल – केशरी रंगांची उधळण अग्निज्वाळांप्रमाणे लखलखते. पांढरा पांढरुख /भुत्या नावडत्या वासाने फुलतो. मंद सुगंधी वारे वाहू लागतात. सूर्योदयाला आकाश पिवळसर नारिंगी तर सूर्यास्ताला तांबडे लाल दिसू लागते. हळद्या, तांबट, राघू, बुलबुल, पातेरी, कोकीळ आणि इतर अनेकांची लगबग, किलबिल लक्ष वेधून घेऊ लागते, वसंत ऋतू त्याच्या संपुर्ण वैभवानिशी अवतरतो. वसंतपंचमी म्हणजे रंगपंचमीपासून वसंताचे आगमन होते. सृष्टीत नाद, रंग, रूप, गंध, स्पर्श यांची लयलूट होते. ज्ञान-विद्या, संगीतादी कलांची अधिष्ठात्री देवी सरस्वतीचा वसंतपंचमी हा जन्मदिवस.देवी शारदेच्या जन्माविषयी एक फार सुंदर कथा पुराणात आहे. सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवाने संपुर्ण विश्व निर्माण केले, जसे की डोंगर- दर्या, समुद्र- नद्या- तलाव, वनस्पती, प्राणी, पक्षी आणि मनुष्य आदींच्या आजूबाजूला हे चित्र निर्माण झालेले दिसते. पण सर्वत्र शांततेचे साम्राज्य, तर कुठे चैतन्याची सळसळ दिसेना आणि सगळे कसे गुपचूप वातावरण निर्माण झालेले असते. जगत्निर्मिती तर झाली पण ब्रह्मदेवांना निर्मितीचा आनंद मिळेना. सगळे निरस भासू लागले. काय करावे सुचेना, अशी स्थिती असते आणि खिन्न, उदास, विमनस्क असे वातावरण झालेले असते. त्यांची बेचैनी पाहून श्री विष्णूंनी ब्रह्मदेवांना आपल्या कमंडलूतील पाणी जमिनीवर शिंपडायला सांगितले. आणि काय आश्चर्य? दैवी सौंदर्याने आलंकृत, शुभ्र हंसावर आरूढ झालेली, शुभ्रवसना, चतुर्भुज, वीणाधारिणी विद्यादेवी सरस्वती प्रकटली. ब्रह्मदेवाने तिला वीणा वादनाचा आग्रह केला. वीणेच्या सुमधूर स्वर्गीय झंकारांनी पृथ्वीवरचे वातावरण अमुलाग्र बदलले. पक्ष्यांचा किलबिलाट, प्राण्यांचे हंबरणे सुरु झाले. भ्रमरांचा गुंजारव, पानांची सळसळ, नदीचा खळखळाट, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, पावसाची रिमझिम बोलू लागली. मानवाला वाणी प्राप्त झाली, भावना व्यक्त करता येऊ लागल्या. ज्ञानप्राप्ती होणे जमले, धरेवर संगीत प्रगटले. देवी शारदेच्या आगमनामुळे जगाचा कायापालट झाला, हे सृष्टी वैभव वसंतात प्रगटलं हे वसंत पंचमीचं महत्व!
दरवर्षी ऋतुराज वसंत वाजत गाजत रंग, गंधांची लयलूट करत अवतरतो. जो संवेदनशील असतो त्याला तो जाणवतो आणि दिसतो. वसंतोत्सवाचा अनुभव घेऊन प्रसन्न होता येते.
आपण आहोत ना सजग. हा निसर्ग सोहळा अनुभवू या आणि स्वतः बरोबरच आपल्या मनाला नवी उमेद देऊ या.
-संतोष पेरणे, खबरबात
RamPrahar – The Panvel Daily Paper