पुणे : प्रतिनिधी
भारत-इंग्लंड यांच्यात अलीकडे एकदिवसीय मालिका खेळल्या गेलेल्या पुण्यातील गहुंजे क्रिकेट स्टेडियम आणि साई नगर परिसरात बिबट्याचा वावर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. काही जणांनी बिबट्या पाहिल्याचा दावा केला आहे. गहुंजे स्टेडियमच्या पाठीमागे डोंगराळ भाग असून निर्मनुष्य परिसर आहे. त्यामुळे बिबट्याचा वावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे काही जणांनी म्हटले आहे. दरम्यान, परिसरात फिरणार्या नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस पाटील हिरामण आगळे यांनी नागरिकांना केले आहे. गहुंजे स्टेडियम आणि साई नगर परिसरात बिबट्या असल्याची चर्चा वार्यासारखी शहरभर पसरली. अनेकांनी परिसरात बिबट्या असल्याचे व्हॉटसअॅप स्टेट्स ठेवले आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याच्या दृष्टिकोनातून लोक माहिती देत आहेत. प्रत्यक्षात मात्र बिबट्या आहे की नाही हे अजून निश्चित झालेले नाही. काही जणांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर परिसरात बिबट्या असल्याचा दावा केला आहे.