मुंबई ः प्रतिनिधी
भारतीय क्रिकेट संघाने 2 एप्रिल 2011 रोजी एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा जिंकली. यंदा भारताच्या विश्वविजेतेपदाला 10 वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने युवराज सिंग, वीरेंद्र सेहवाग यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावर खास क्षण आठवून पोस्ट शेअर केल्या. दरम्यान, या घटनेसंबंधित सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि युवा फलंदाज पृथ्वी शॉ अंतिम सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये एकत्र सामन्याचा आनंद घेताना दिसत आहेत. ट्विटरवर एका चाहत्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये अर्जुन तेंडुलकर आणि पृथ्वी शॉ शेजारी बसलेले दिसत आहेत. या फोटोत अर्जुनने मुंबई इंडियन्सची जर्सी आणि कॅप घातली आहे. हा फोटो पाहून चाहते सोशल मीडियावर विविध कमेंट्स करीत आहेत. आयपीएल लिलावात अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने 20 लाखांच्या बेस प्राइसवर खरेदी केले. तो आता पहिल्यांदा इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसणार आहे, तर पृथ्वी शॉ दिल्ली कॅपिटल्स संघाचा एक भाग आहे. यंदा हे दोन्ही खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे आयपीएलमधील त्यांच्या कामगिरीकडे लक्ष असेल.