आज दिल्लीविरुद्ध पहिली लढत
चेन्नई ः वृत्तसंस्था
आयपीएलच्या गेल्या वर्षीच्या मोसमात अपेक्षित कामगिरी करता न आलेल्या धोनी ब्रिगेड अर्थात चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके)च्या चाहत्यांना यंदा या संघाकडून बर्याच अपेक्षा आहेत. जोश हेझलवूडच्या जागी ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाज जेसन बेरेनडॉर्फ आता चेन्नईच्या संघात दाखल झाला आहे. सीएसकेने नुकताच जेसनसोबत करार केला आहे.
जेसन बेरेनडॉर्फच्या समावेशामुळे चेन्नईची गोलंदाजी समतोल झाल्याचे दिसत आहे. बेरेनडॉर्फने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11 एकदिवसीय आणि सात टी-20 सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये 2019मध्ये तो मुंबई इंडियन्सकडून पाच सामने खेळला होता. या सामन्यांमध्ये त्याने पाच विकेट्सदेखील घेतल्या होत्या. बेरेनडॉर्फने आतापर्यंत एकूण 79 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 90 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे त्याच्या या अनुभवाचा चेन्नईला नक्कीच फायदा होऊ शकेल. चेन्नई आपला सलामीचा सामना 10 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरोधात खेळणार आहे.
रवींद्र जडेजाचे पुनरागमन
काही दिवसांपूर्वीच धोनीसाठी चिंतेचा विषय ठरलेला अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा पुन्हा फिट होऊन संघात परतला आहे. त्यामुळे दिल्लीविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी जडेजा खेळण्यासाठी उपलब्ध असणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यामध्ये जडेजाच्या डाव्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याने एकही सामना खेळलेला नाही.