Breaking News

डब्ल्यूटीसी फायनल ठरल्यानुसारच होईल!

आयसीसीचे स्पष्टीकरण

लंडन ः वृत्तसंस्था
साऊदम्प्टन येथे 18 जूनपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारी जागतिक कसोटी अजिंक्यपदाची (डब्ल्यूटीसी) अंतिम लढत पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच होणार, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) स्पष्ट केले आहे. सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी भारतीय संघ ब्रिटनमध्ये दाखल होईल, असेही आयसीसीने सांगितले.
ब्रिटनमध्ये कोणत्याही देशांच्या नागरिकांना येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्याचबरोबर ब्रिटनमधील रहिवाशांना मायदेशी परतण्यासाठी 10 दिवसांचे विलगीकरण सक्तीचे करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर जैव-सुरक्षित वातावरणात जागतिक कसोटी अजिंक्यपदाची अंतिम लढत आयोजित करण्याचा विश्वास आयसीसीने व्यक्त केला.
‘इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळ तसेच अन्य सदस्यांना कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सुरक्षितपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे कसे आयोजन करावे, याची चिंता सतावत आहे, पण आम्ही जागतिक कसोटी अजिंक्यपदाची लढत आयोजित करण्याबाबत आश्वस्त आहोत. त्यामुळे ही लढत पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच होईल. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे ब्रिटनचा लाल यादीत समावेश करण्यात आला असला तरी आम्ही ब्रिटन सरकारशी चर्चा करीत आहोत,’ असे आयसीसीच्या पत्रकात म्हटले आहे.
दरम्यान, भारतीय महिला संघही जून महिन्यात इंग्लंड दौर्‍यावर जाणार आहे. त्याचबरोबर पुरुष संघही 4 ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. आयपीएलचा अंतिम सामना 30 मे रोजी अहमदाबाद येथे आटोपल्यानंतर काही दिवसांतच भारतीय संघ लंडनला रवाना होणार आहे.
बीसीसीआय म्हणते…
या क्षणी काहीही सांगणे उचित ठरणार नाही. भारतीय संघ जूनच्या पहिल्या आठवड्यात ब्रिटनला रवाना होणार आहे. जूनमध्ये परिस्थिती कशी असेल, हे आताच सांगता येणार नाही. कोरोनाची स्थिती पाहून प्रवासाबाबतीत प्रमाणित कार्यप्रणाली तयार करण्यात येते, मात्र जूनमध्ये ब्रिटनचा लाल यादीत समावेश असेल तर आम्हाला 10 दिवस कठोर विलगीकरणात राहावे लागेल, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) पदाधिकार्‍याने सांगितले.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply