अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पेणजवळील जेएसडब्ल्यू कंपनीच्या रूग्णालयात जम्बो कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी आमदार रविशेठ पाटील यांनी केली होती. त्या अनुषंगाने जेएसडब्ल्यू कंपनीच्या रूग्णालयात 800 बेडचे जम्बो कोविड सेंटर उभे रहात आहे. तब्बल 800 बेडचे हे अद्यावत कोविड सेंटर टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असून त्याची जोरदार तयारी सुरू आहे.
आजच्या घडीला रायगड जिल्ह्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेला पहायला मिळत आहे. दररोज हजारहून अधिक नवीन रुग्णांची नोंद होत आहे. अपुर्या सुविधांमुळे रुग्णांची मोठी हेळसांड होत आहे. जिल्ह्यात आजच्या घडीला 11 हजार 572 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. त्यामुळे रुग्णालये अपुरी पडताहेत. आगामी काळात कोरोनाचा प्रादुर्भाव असाच वाढत राहिला तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील कोरोना विषाणूंचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध असलेल्या जेएसडब्ल्यू कंपनीच्या डोलवी (ता. पेण) रुग्णालयात सर्व सुविधायुक्त अद्ययावत जम्बो कोविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी होत होती. त्या अनुषंगाने जेएसडब्ल्यू कंपनीच्या रूग्णालयात 800 बेडचे जम्बो कोविड सेंटर उभे रहात आहे. सुरुवातीला 100 त्यानंतर 200 – 200 – 200 अशी टप्प्याटप्प्याने येथील बेडची संख्या वाढवण्यात येणार आहे. यामध्ये साध्या बेडबरोबरच ऑक्सिजन व व्हेंटीलेटरचीदेखील सुविधा असणार आहे. जिंदाल गृपचे संचालक सज्जन जिंदाल यांनीदेखील या कोविड केअर सेंटरसाठी आवश्यक ते सर्व प्रकारचे सहकार्य करण्याच्या सूचना येथील कंपनी प्रशासनास दिल्या आहेत.
पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आज या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून माहिती घेतली. या वेळी अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार अरूणा जाधव व स्थानिक प्रशासनातील इतर अधिकारी तसेच जेएसडब्ल्यू कंपनीचे प्रकल्प प्रमुख गजराज सिंग राठोड, राजेशकुमार रॉय, मुकेशकुमार, रुग्णालयाचे प्रमुख शुभंकर शहा, नारायण बोलबुंडा, प्रज्वल शिर्सेकर, मगरखान उपस्थित होते.