बार्सिलोना ः वृत्तसंस्था
जागतिक क्रमवारीत दुसर्या स्थानी असलेल्या स्पेनच्या राफेल नदालने स्टीफनोस सितसिपासला 6-4, 6-7(6), 7-5 असे पराभूत करीत 12व्यांदा बार्सिलोना ओपन स्पर्धा जिंकली आहे. नदालने इल्या इवाश्का, केई निशिकोरी, कॅमेरून नॉरी आणि पाब्लो कॅरेनो बुस्टा अगुट यांचा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती.
यापूर्वी नदालने 2018मध्ये बार्सिलोना ओपनच्या अंतिम सामन्यातही सितसिपासला हरवून विजेतेपद जिंकले होते. विजयानंतर नदाल म्हणाला, हे जेतेपद माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. एका वर्षानंतर घरातील प्रेक्षकांसमोर खेळणे ही एक सुखद अनुभूती आहे. स्टीफनोस चांगला प्रतिस्पर्धी आहे. अंतिम फेरी खूप कठीण होती.
20 वेळा ग्रँडस्लॅम विजेत्या नदालच्या कारकीर्दीचे हे 87वे विजेते आहे. गेल्या वर्षी फ्रेंच ओपन स्पर्धेचे जेतेपद मिळवल्यानंतर हे त्याचे यंदाचे पहिलेच विजेतेपद आहे. एटीपी 500 स्पर्धेचे विजेतेपद जिंकल्यानंतर नदाल एकमेव खेळाडू आहे ज्याने 12 किंवा अधिक वेळा एकच स्पर्धा जिंकली आहेत. त्याने 12 वेळा रोलंड गॅरोसचे जेतेपदही जिंकले आहे.