कर्जत : बातमीदार
माथेरानमध्ये पर्यटन व्यवसाय बंद असून पर्यटकांअभावी येथील घोड्यांची उपासमार होत आहे. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच पनवेलमधील दानशूरांनी माथेरानमध्ये येऊन घोड्यांसाठी 250 बॅग भुसा (चारा) दिला. माथेरानमध्ये एकूण 460 घोडे असून त्याचा वाहतुकीसाठी वापर होतो. लॉकडाऊनमुळे माथेरानमधील पर्यटन व्यवसाय थांबल्याने तेथील घोड्यांच्या खाद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हायडॅक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे आनंद पवार आणि त्यांचे सहकारी काही सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मुक्या प्राण्यांची काळजी घेण्यासाठी पुढे सरसावले आहेत. लॉकडाऊनमुळे घोड्यांचा सांभाळ कसा करावा, अशा विवंचनेत येथील घोडेवाले असतानाच आनंद पवार यांनी आपल्या मित्रांच्या मदतीने माथेरानमधील घोडेवाल्यांना 250 बॅग भुसा वाटप करण्याचे ठरविले. त्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये 125 बॅग्ज दाखल झाल्या असून दोन दिवसांत 125 बॅग्ज दाखल होणार आहेत. महावितरण कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या अश्वखाद्य वाटपावेळी कर्जत पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाचे किसन देशमुख, माथेरान पशुसंवर्धन अधिकारी अरुण राजपूत, स्थानिक अश्वपाल संघटनेच्या अध्यक्ष आशा कदम तसेच अश्वपालक उपस्थित होते. या अश्वखाद्य वाटपामुळे माथेरानमधील घोडेवाल्यांना आधार मिळाला आहे.
वर्तमानपत्रातील बातमी वाचून मी व सेल्स टॅक्स विभागातील माझे मित्र दिलीप नानोटे यांनी थेट माथेरान गाठून आढावा घेतला. तेथील अश्वपाल संघटनेच्या पदाधिकार्यांशी चर्चा करून स्थानिक घोडेवाल्यांना अश्वखाद्याचे वाटप केले.
-आनंद पवार, प्रतिनिधी, हायडॅक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, पनवेल
RamPrahar – The Panvel Daily Paper