Breaking News

घोड्यांचा चारा वाटपावरून माथेरानमधील दोन संघटनांत वाद

कर्जत : बातमीदार

लॉकडाऊनमुळे गतवर्षीप्रमाणे यावर्षीही माथेरानचा   पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे येथील अश्वचालकांवर बिकट परिस्थिती ओढावली असून त्यांच्या  घोड्यांच्या चार्‍याचाही प्रश्न निर्माण झाला होता. मात्र प्राणीप्रेमी व अनेक दानशूर व्यक्तींनी घोड्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आणि माथेरानमध्ये अश्वखाद्याचा ओघ सुरु झाला. चार्‍याच्या या मुबलक मदतीमुळे येथील दोन संघटनांमध्ये वाद निर्माण झाला असून तो विकोपाला गेला आहे. माथेरानचे पर्यटन बंद झाल्याने येथील घोड्यांना चारा व खाद्याची गरज आहे, असे आवाहन येथील स्थानिक अश्वपाल संघटनेने करताच येथे मदतीचा ओघ सुरु झाला. त्याचवेळेस दस्तुरीनाका येथे व्यवसाय करीत असलेल्या मूळवासीय अश्वपाल संघटनेनेही असेच आवाहन केले. त्यामुळे त्यांच्याकडेही मदत पोहचली होती. दोन्ही संघटनांना वेगवेगळ्या दानशूर व्यक्तींकडून मदतीचा ओघ सुरू आहे. या संघटना आपापल्या सभासदांना भुसा व चारा वाटप करीत आल्या होत्या. आता वाटपासाठी गोणी,  भुशावरुन दोन्ही संघटनांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. दोन्ही संघटनांनी एकमेकांवर भुसा वाटपामध्ये घोळ केला जात असल्याचे आरोप केले आहेत.

माथेरानमध्ये 460 घोड्यांसाठी भुसा येत आहे. मात्र वाटपात स्थानिक अश्वपाल संघटनेकडून धनगर समाजातील सदस्यांना डावलले जात आहे. यापुढे सर्व प्राणीमित्रांना नम्र विनंती आहे की, त्यांनी स्वतः येऊन भुसा वाटप करावा. जेणेकरुन सर्वांना भुसा मिळेल अन्यथा भुसा नाही दिला तरी चालेल.

-राकेश कोकळे, अध्यक्ष, स्थानिक धनगर समाज, माथेरान

माथेरान अश्वपाल संघटना ही एक कुटुंब असून त्यामधील सर्वधर्मीय सभासद आलेल्या मदतीचा लाभ घेत असतात. पण मूळवासीय संघटना आलेली मदत फक्त स्वतःच्या संघटनेतच वाटप करीत असल्याने त्यांना आमच्या संघटनेकडे मदत मागण्याचा नैतिक अधिकार नाही

-आशाताई कदम, नेत्या, अश्वपाल संघटना, माथेरान

Check Also

शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमी साता समुद्रापार -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमी नाव हे साता समुद्रापार पोहचले असून या सुसज्ज …

Leave a Reply