
रोहे ः प्रतिनिधी
सबका साथ सबका विकास, या मंत्रानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने जनहिताची कामे केली आहेत. या सरकारमध्ये निष्कलंक नेता म्हणून अनंत गीते यांनी काम केले. केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार यावे यासाठी अनंत गीते यांनाच निवडून द्यावे, असे आवाहन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रोहे येथे केले.
रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी रोह्यातील राम मारूती चौकात आयोजित केलेल्या जाहीर सभेत ना. चव्हाण बोलत होते. भाजप सरकारच्या काळातच देशाचा विकास आणि प्रगती झाल्याचा दावा त्यांनी या वेळी केला.
यापूर्वी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते कळत नव्हते, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने विकासकामांचा झपाटा लावला. पंतप्रधान सडक योजनेतून रस्ते झाले. दिघी पोर्ट ते पुणे तसेच अन्य रस्त्यांसाठी रायगडात 600 कोटींपेक्षा जास्त निधी आला. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून राज्यातील 18 हजार गावे दुष्काळमुक्त झाली, असे सांगून पालकमंत्र्यांनी मोदी सरकारच्या विविध योजनांचा आढावा या वेळी घेतला.
पूर्वी मोहल्ले हे आपली व्होट बँक असल्याचे विरोधक समजायचे, मात्र बॅ. अंतुले यांचा मुलगा नविद अंतुले शिवसेनेत आल्याने त्यांची ही जहागीरदारी खालसा होण्यास सुरुवात झाली आहे. आज मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने शिवसेना व भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत, असे सांगून महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांनी या निवडणुकीत आपण सव्वा ते दीड लाखाच्या फरकाने जिंकणार असल्याची ग्वाही दिली.
अनंत गीते यांच्या विजयासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन शिवसेना उपनेते सूर्यकांत महाडिक यांनी केले, तर बॅ. अंतुले यांचे स्वप्न साकार करण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला विजयी करा, असे आवाहन नाविद अंतुले यांनी केले. शिवसेना तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी सुनील तटकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. भाजपचे अलिबाग विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांचेही या वेळी भाषण झाले. या वेळी धाटाव येथील युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.
माजी आमदार तुकाराम सुर्वे, जि. प.विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, रोहा तालुका समन्वय समिती अध्यक्ष संजय कोनकर, शिवसेना जिल्हाप्रमुख रवि मुंढे, किशोर जैन, संपर्क प्रमुख सदानंद थरवळ, विलास चावरी, महिला आघाडी संघटक सुवर्णाताई करंजे, भाजपचे श्रीवर्धन विधानसभा मतदार संघ अध्यक्ष कृष्णा कोबनाक, ज्येष्ठ नेते विष्णू पाटील, जिल्हा चिटणीस राजेश मापारा, भाजप युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अमित घाग, भाजप तालुका प्रमुख सोपन जांबेकर, नगरसेविका समिक्षा बामणे, शहरप्रमुख दीपक तेंडुलकर, उस्मान रोहेकर, सुलतान मुकादम, नीता हजारे, विष्णू लोखंडे, यतिन धुमाळ, राजेश काफरे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper