Breaking News

नवी मुंबईत भाजीपाला बाजार आवारात लसीकरण केंद्र सुरू; आमदार मंदा म्हात्रे यांचे प्रयत्न

नवी मुंबई : प्रतिनिधी

एपीएमसी भाजीपाला बाजार आवारातील व्यापारी, माथाडी कामगार, गुमास्ता वर्ग, सफाई कर्मचारी यांना थेट लसीकरणाचा लाभ घेता यावा, याकरिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार  मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नाने वाशी येथील एपीएमसी घाऊक भाजीपाला बाजार आवारात कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. या वेळी एपीएमसी घाऊक बाजार व्यापारी महासंघाचे अध्यक्ष शंकरशेठ पिंगळे, कैलास ताजने, गणेश पावगे, शिंगरकर, बाळासाहेब जाधव, बापूशेठ शेवाळे, डॉ. दीपक आवटे, डॉ. वंदना नारायणी आदी उपस्थित होते. एपीएमसी बाजार हा कोरोनाचा हॉटस्पॉट असल्याने कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी या आधी ग्रोमा सेंटर येथे कोविड लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. तसेच आता भाजीपाला बाजार आवारातही लसीकरण केंद्र सुरू केल्याने जास्तीत जास्त व्यापारी, कामगारांना त्याचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान, धर्मवीर संभाजीराजे भोसले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणे, भाजीपाला आवारात सर्व सुविधांयुक्त स्वच्छता गृह उभारण्याची मागणी या वेळी व्यापार्‍यांनी आमदार मंदा म्हात्रे यांजकडे केली. या वेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले की, एपीएमसी बाजार आवारात येणार्‍या सर्व व्यापारी, माथाडी कामगार तसेच गुमास्ता वर्गाला कोव्हीड लस उपलब्ध होऊन बाजार आवारामध्येच सर्वांना एकत्रित लाभ घेता यावा, याकरिता महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग तसेच व्यापारी, माथाडी कामगार, गुमास्ता वर्ग यांची लसीकरणासाठी सातत्याने होणारी मागणी लक्षात घेता एपीएमसीच्या सर्व बाजार आवारात लसीकरण केंद्र उपलब्ध करण्यात येणार असल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले. एपीएमसी भाजीपाला बाजारात पुरुषांकरिता व महिलांकरिता दोन स्वतंत्र स्वच्छता गृहे आमदार निधीतून बांधण्यात येणार असल्याचे तसेच धर्मवीर संभाजीराजे महाराज यांचा पुतळा उभारण्याबाबतचा प्रस्ताव घेऊन लवकरच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. लसीकरण केंद्र उपलब्ध केल्याबद्दल सर्व व्यापारी आणि कामगारांच्या वतीने शंकरशेठ पिंगळे यांनी आमदार मंदा म्हात्रेंचे आभार मानले.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply