पनवेल ः रामप्रहर वृत्त
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी 10 जूनला झालेल्या भव्य व आदर्श मानवी साखळीने संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष वेधून वाहवा मिळवली. आता 24 जूनच्या आंदोलनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. 24 जूनला सिडकोवर लाखो ‘दिबा’प्रेमी धडक देणार आहेत. त्या अनुषंगाने सर्वपक्षीय कृती समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली गव्हाण, पाली देवद जिल्हा परिषद व पळस्पे, कोन पंचायत समिती विभागनिहाय बैठका झाल्या. या वेळी सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती लाभली. ‘निर्धार पक्का, ‘दिबा’साहेबांचेच नाव पक्के,’ ही प्रामाणिक भूमिका घेत आंदोलनाचे नियोजन जवळपास पूर्ण झाले आहे. आता सिडकोला घेराव घालण्यासाठी 24 जूनची सर्व जण वाट पाहत आहेत. या बैठकांस भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल पं. स. सदस्य आणि भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, तालुका सरचिटणीस व माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, ज्येष्ठ नेते सुभाष जेठू पाटील, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील, योगेश लहाने, आनंद ढवळे, उपसरपंच मच्छींद्र दुर्गे, निलेश म्हात्रे, सतीष पाटील, नामदेव पाटील, मोहन दुर्गे, आप्पा भागीत, ज्ञानेश्वर पाटील, घनशाम पाटील, संदेश लहाने, महेश लहाने, संदेश पाटील, विविध ग्रामपंचायतींचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्यासह इतर पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
भूमिपुत्र सावित्रींची सिडकोच्या दारातच वटपौर्णिमा
सिडको घेराव आंदोलनात ज्येष्ठ व तरुणांची फौज महत्त्वाची भूमिका पार पाडताना महिलाही मागे नाहीत. 24 जूनला योगायोगाने वटपौर्णिमा आहे. तरी भूमिपुत्र सावित्रींनी यंदाची वटपौर्णिमा आंदोलनात साजरी करण्याचा निर्धार केलाय. महिला सौभाग्यासाठी सिडकोच्या दारातच वटपौर्णिमा साजरी करणार असून विमानतळाला दिबांचे नाव मिळेपर्यंत संघर्षात महिलांचाही सहभाग असेल.
RamPrahar – The Panvel Daily Paper