नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
2021-22च्या स्थानिक हंगामातील सर्व प्रकारच्या क्रिकेट स्पर्धांच्या तारखा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) जाहीर करण्यात आल्या आहेत. यानुसार रणजी करंडक स्पर्धेला 16 नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. इराणी, दुलीप आणि देवधर करंडकांच्या आयोजनाबाबत मात्र बीसीसीआयने घोषणा केलेली नाही. यंदा 20 ऑक्टोबरपासून सय्यद मुश्ताक अली स्पर्धेद्वारे पुरुषांच्या स्थानिक हंगामाची सुरुवात होईल. ही स्पर्धा 12 नोव्हेंबरपर्यंत चालेल. रणजी करंडक स्पर्धा 16 नोव्हेंबर ते 19 फेब्रुवारी या कालावधीत खेळली जाणार आहे, तर विजय हजारे चषक स्पर्धा 23 फेब्रुवारी ते 26 मार्चदरम्यान होईल. महिलांची एकदिवसीय लीग 21 सप्टेंबरपासून रंगणार आहे. ती 22 ऑक्टोबरपर्यंत चालेल. त्यानंतर एकदिवसीय चॅलेंजर करंडक 27 ते 31 ऑक्टोबरदरम्यान, तर ट्वेन्टी-20 लीग 19 मार्च ते 11 एप्रिल या कालावधीत होणार आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper