Breaking News

रायगडात आता विविध रंगी भातपिकाचे उत्पादन

अलिबाग ः प्रकाश सोनवडेकर
भाताचे कोठार म्हणून ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यात आता विविध रंगी भातपिकाची लागवड केली जाणार आहे. यंदा जिल्ह्यात 210 हेक्टर क्षेत्रावर काळा, लाल व जांभळ्या रंगाच्या भाताची लागवड केली जाणार आहे.
रायगड जिल्ह्यात एक लाख 74 हजार 483 एवढे भात लागवडीचे क्षेत्र आहे. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात एक लाख चार हजार 31 हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्याचे तसेच उत्पादकता हेक्टरी 2993 किलोग्रॅम करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. या वर्षी परंपरिक पांढर्‍या रंगाच्या भाताबरोबरच काळा, लाल व जांभळ्या रंगाच्या भाताची लागवडदेखील केली जाणार आहे.
लाल, काळ्या आणि जांभळ्या रंगाच्या या भातात प्रथिने आणि कर्बोदकांचे प्रमाण सामान्य भाताच्या तुलनेत अधिक असते. हा भात मधुमेह आणि इतर आजारांतील रुग्णांसाठी उपयुक्त असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे  या प्रकारच्या भाताला मागणी वाढली आहे. काळ्या भाताला 400 रुपये किलो एवढा भाव मिळतो. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील शेतकर्‍यांनीदेखील या भातची लागवड करावी यासाठी कृषी विभागाने प्रयत्न केले. छत्तीसगड राज्यातून व ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथून काळ्या रंगाच्या तसेच लाल रंगाच्या भाताची बियाणी मागविण्यात आली. कर्जत येथील सगुणा बागेतून जांभळ्या रंगाच्या भाताची बियाणी मागविण्यात आली. ती जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील निवडक शेतकर्‍यांना देण्यात आली आहेत. 210 हेक्टरवर त्याची लागवड केली जाणार आहे.
ज्या शेतकर्‍यांना यंदा बियाणे उपलब्ध करून दिले आहेत त्यांनी उत्पादित भातपिकातून काही बियाणे इतर शेतकर्‍यांना पुढील वर्षीच्या लागवडीसाठी उपलब्ध करून द्यायचे आहे. यामुळे दरवर्षी लाल, काळ्या आणि जांभळ्या भातपिकाच्या लागवडीखालील
क्षेत्र वाढणार आहे.

नैसर्गिक बदलामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे जास्त उत्पन्न मिळवून देणार्‍या लाल, काळ्या आणि जांभळ्या रंगाच्या भाताची लागवड  करण्याचा पर्याय आम्ही रायगड जिल्ह्यातील शेतकर्‍यांना उपलब्ध करून दिला आहे. उत्पादित भाताच्या मार्केर्टिंगसाठीही आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. भविष्यात या जातींच्या भात लागवडीचे क्षेत्र वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे.
-उज्ज्वला बाणखेले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply