मुरूड : प्रतिनिधी : तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये गुरुवारी (दि. 18) दुपारी नारळाचे झाड बाजूच्या एका घरावर आणि रस्त्यावर कोसळले. त्यामुळे घरातील तीन व्यक्ती जखमी झाल्या, तर रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
नांदगाव येथील भवानी पाखाडी येथील अब्दुलसत्तार म्हसलाई यांच्या बागायत जमिनीमधील एक नारळाचे झाड जोरदार वार्यामुळे मुळासकट कोसळले. ते बाजूच्या घराच्या छपरावर पडल्याने सिमेंटचे पत्रे तुटून घरातील पंकज शिरसाट (वय 9) आणि त्याची आई जखमी झाली, तसेच नांदगाव हायस्कूलचे पर्यवेक्षक उत्तम वाघमोडे यांच्याही हाताला फ्रॅक्चर झाले आहे. कोसळलेल्या नारळाच्या झाडाचा काही भाग रस्त्यावर पडल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली होती, मात्र मदतीला धावून आलेल्या नागरिकांनी कट्टर मशीनद्वारे नारळाच्या झाडाचे तुकडे करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.