नवी दिल्ली ः प्रतिनिधी
कोरोनाविरोधात लढ्यासाठी केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मिळून एकूण एक हजार 827 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. केंद्राकडून मंजूर केला गेलेला हा निधी इमर्जन्सी कोविड रिस्पॉन्स पॅकेजच्या 15 टक्के इतका आहे. आरोग्यमंत्री मांडवीय पुढे म्हणाले की, देशभरात 31.4 मिलियन लसीच्या डोसचा साठा सध्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे आहे तसेच देशात 48 कोटी 78 लाख डोस पुरवण्यात आले असून 68 लाख 57 हजार 590 डोस पाठवले जात आहेत. आतापर्यंत 45 कोटी 82 लाख 60 हजार 52 डोस देण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार कोरोनाविरुद्धच्या लढाईत जनतेला आवश्यक ते सहकार्य करीत आहे. सध्या लसीकरण जोमाने सुरू आहे.