कोरोना रुग्ण दर वाढीच्या बाबतीत एप्रिल 2021 मध्ये रायगड जिल्हा राज्यात आघाडीवर होता. एक काळ असा होता की रायगड जिल्ह्यात रुग्ण वाढीचा दर 30 टक्क्यांपेक्षाही जास्त होता. आता हा दर 2.52 इतका कमी आला आहे. त्यामुळे रायगडमधील सर्व निर्बंध उठणार आहेत. ही रायगडकरांसाठी दिलासादायक बाब आहे. रायगडचा रुग्ण वाढीचा दर कमी झाला असला, तरी तिसर्या लाटेचा धोका अजून कायम आहे. पहिल्या लाटेनंतर बेजबाबदारपणे वागल्याचे परिणाम दुसर्या लाटेत भोगावे लागले आहेत. त्यामुळे रायगडकरांना यापुढे जबाबदारीने वागावे लागेल. दुसर्या लाटेत रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्यानंतर साप्ताहिक करोनाबाधितांचे प्रमाण आणि प्राणवायूयुक्त खाटांची संख्या लक्षात घेऊन राज्य शासनाने पाच स्तरांत निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली. यात रायगड जिल्ह्याचा चौथ्या स्तरात समावेश करण्यात आला होता. शेजारील मुंबई व ठाणे जिल्ह्यात रुग्ण संख्या कमी होत असताना रायगड जिल्ह्यात हे प्रमाण वाढत होते. जेव्हा मुबईत रुग्ण संख्या वाढीचा दर पाच टक्के होता, तेव्हा रायगडमध्ये हाच दर 13 टक्के होता. मृत्यूदर वाढला होता. त्यामुळे राज्य शासनाने रायगड जिल्ह्यात कडक निर्बंध घातले. पहिली लाट संपल्यामुळे राज्य शासनाने टाळेबंदी उठवली. त्या वेळी जनता बेजबाबदारपणे वागली. प्रशासकीय यंत्रणांनी काही बाबींकडे दुर्लक्ष केले. लग्नसमारंभातील होणारी गर्दी रोखण्यासाठी फारसे प्रयत्न झाले नाहीत. आंतरजिल्हा वाहतुकीवर निर्बंध असताना जलप्रवासी वाहतूक निर्धोक सुरू होती. ग्रामीण भागात अत्यावश्यक आणि अत्यावश्यक नसलेली दुकाने सुरूच होती. बाजारपेठांमधील गर्दी रोखण्यासाठी फारसे प्रयत्न झालेच नाहीत. विनाकारण फिरणार्यांवर कठोर कारवाई करण्याकडे यंत्रणांनी दुर्लक्ष केले. पहिल्या लाटेनंतर शासनाने जी सूट दिली त्याचा जनतेने गैरफायदा घेतला. लोक बेजबाबदारपणे वागले. त्यामुळे दुसर्या लाटेत त्याचे परिणाम भोगावे लागले. याचा विचार आता रायगडकरांनी केला पाहिजे. ताज्या आकडेवारीनुसार रायगड जिल्ह्यात सध्या रुग्ण वाढीचा दर 2.25 इतका आहे. त्यामुळे आता रायगडातील निर्बंध उठतील. पहिल्या लाटेनंतर ज्याप्रमाणे बेजबाबदारपणे लोक वागले, तसे आता वागून चालणार नाही. कारण तिसर्या लाटेचा धोका अजून कायम आहे. रायगड हा पर्यटन जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्यात पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असतात. परजिल्ह्यातून येणार्या पर्यटकांचे स्वागत करतानाच त्यांना कारोनाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळण्यास भाग पाडले पाहिजे. दुसर्या लाटेत अलिबाग व मुरूड तालुक्यात रुग्णांचे प्रमाण जास्त होते. जेथे कोरानाचे रुग्ण जास्त होते, ती गावे समुद्र किनार्यालगतची होती, हे विसरून चालणार नाही. रायगडात कोरानाची तिसरी लाट येऊ द्यायची नसेल, तर प्रशासन व जनता दोघांनाही जबाबदारीने वागावेच लागेल. सावध राहावे लागेल. गाफील राहून चालणार नाही.
लसीकरणाचा वेग वाढवा
रायगड जिल्ह्यात करोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग मंद आहे. रायगड जिल्ह्यात नऊ लाख 56 हजार 980 जणांनी करोनाची लस घेतली आहे. यातील सात लाख 32 हजार 70 जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर दोन लाख 24 हजार 910 जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. जिल्ह्यात लसीकरणासाठी प्रामुख्याने कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लसींचा वापर केला जात आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून कोविशिल्ड लस पुरवठा अचानक घटला आहे. त्यामुळे दुसऱा डोस घेण्यासाठी नागरिकांना बराच काळ वाट पाहावी लागत आहे. जिल्ह्यात 11 ऑगस्ट रोजी 64 लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरू होते. यात 29 शासकीय, तर 35 खाजगी लसीकरण केंद्रांचा समावेश होता. म्हणजेच बहुतांश शासकीय लसीकरण केंद्र लसीआभावी बंद होती. शासकीय लसीकरण केंद्रांच्या तुलनेत खाजगी लसीकरण केंद्र जास्त प्रमाणात कार्यरत आहे. यावरून शासकीय लसीकरण केंद्रांवर लसींचा तुटवडा आहे. रायगड जिल्ह्यात लस घेण्यात महिलांचे प्रमाण कमी आहे. पाच लाख 57 हजार 324 पुरुषांनी तर तीन लाख 99 हजार 540 महिलांनी लस घेतली आहे. याचा अर्थ लस घेणार्यांमध्ये महिलांचे प्रमाण कमी आहे. महिलांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे लागेल. त्याचप्रमाणे आदिवासी पाड्यांवरदेखील लसीरकण मोहीम राबवावी लागेल. लसीकरणाचा वेग वाढवावा लागेल.
-प्रकाश सोनवडेकर
RamPrahar – The Panvel Daily Paper