मुरूड : प्रतिनिधी
शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या महावीर भाजी मार्केटचे पहिल्या मजल्यावरील गाळे भाडेतत्त्वावर न दिल्याने मुरूड नगर परिषदेचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे. या बहुउद्देशीय इमारतीचा उपयोग मात्र फक्त भाजी विक्रेत्यांसाठीच होत असल्याने नगर परिषदेचा मोठा तोटा होत आहे. वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून मुरूड नगर परिषदेने 2014-15 मध्ये महावीर भाजीमार्केट बांधले आहे. या मार्केटचे उद्घाटन 15 ऑक्टोबर 2018 रोजी करण्यात आले होते. दुमजली महावीर भाजी मार्केटचा तळमजला पार्किंगसाठी तर पहिल्या मजल्यावर भाजीमार्केट असावे, असे ठरले होते, पण प्रत्यक्षात पार्किंगच्या जागेत भाजी मार्केट सुरू करण्यात आले आहे, तर वरचा मजला रिकामा ठेवण्यात आला आहे. उद्घाटनापूर्वी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गाळे छोटे असल्याने त्या ठिकाणी न बसण्याचा पवित्रा भाजीविक्रेत्यांनी घेतला होता. त्यामुळे पार्किंगची जागा भाजी विक्रेत्यांना देऊन त्या ठिकाणी भाजीमार्केट सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे भाजी विक्रेत्यांकरिता करता पहिल्या मजल्यावर बांधलेले 18 गाळे आजही धूळखात पडून आहेत. हे गाळे भाडेतत्त्वावर न दिल्याने नगर परिषदेचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. याबद्दल नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.