Breaking News

स्वच्छ सर्वेक्षणला भिकार्यांचे ग्रहण

नवी मुंबईत मांडले बस्तान

नवी मुंबई : प्रतिनिधी

‘क्लिनर टुडे, बेटर टुमारो’ ‘निश्चय केला नंबर पहिला’ स्वच्छतेसाठी जुळले कर नवी मुंबई नंबर वन शहर, स्वच्छ सर्वेक्षण 2021 अशा प्रकारे नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छ अभियानादरम्यान नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र या अभियानाचे तीनतेरा वाजल्याचे चित्र दिसत आहे. वाशी, सानपाडा, ऐरोली, कोपरखैरणे, नेरूळ या ठिकाणी पुलाखाली भिकारी व अन्य लोकांनी बस्तान बांधले असून याचा नाहक त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे.

यातील अनेक परप्रांतीय असून या लोकांनी आपले बस्तान पदपथावर बसवले आहे. या ठिकाणी दिवसभर रहात असल्याने रात्रीच्या वेळेस नैसर्गिक विधीदेखील केला जातो. यामुळे या दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. ऐरोली बस डेपो व स्टेशन परिसरातील पदपथावर काही परप्रांतीय भिकार्‍यानी कुटुंबासकट ठाण मांडले असून दिवसरात्र पडून असतात. पदपथावरील रेलिंगवर एका ओळीत कपडे टाकलेले असून बाजूलाच पदपथावर चूल मांडून बसले आहेत. येथून हाकेच्या अंतरावर नवी मुंबई पालिकेच्या अतिक्रमण विभागाला पदपथावरील अतिक्रमण दिसत नाही का, असा सवाल नागरिकांनी केला आहे.

पालिकेला वॉटर प्लस मानांकन मिळाले खरे, पण याचा बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत आहे. इतर ठिकाणी पालिकेचे अतिक्रमण अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. ऐरोली बस डेपो व स्टेशन परिसरात परप्रांतीय भिकार्‍यांनी आपले बस्तान मांडले आहे, तसेच दिवा गाव सर्कल येथील स्कायवॉक वरदेखील भिकार्‍यानी ठाण मांडले आहे. नेरूळ रेल्वे स्टेशन परिसर, अभ्युदय बँक रोड, सानपाडा रेल्वे स्टेशन पूर्व भागात भिकारी वर्षानुवर्षे ठाण मांडून आहेत. सीबीडी रेल्वेस्टेशन, बसस्थानक आदी ठिकाणी भिकार्‍यांनी बस्थान मांडले असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Check Also

केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमुळेमहिलांच्या जीवनात समृद्धी -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तकेंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांमुळे समाजातील प्रत्येक महिलेचा स्वाभिमान जागा …

Leave a Reply