पाचव्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा
लंडन ः वृत्तसंस्था
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील अखेरच्या सामन्यासाठी इंग्लंडने संघाची घोषणा केली आहे. इंग्लंडच्या संघात दोन बदल करण्यात आले असून डावखुरा फिरकी गोलंदाज जॅक लेच आणि यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर या दोन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. मालिकेमध्ये भारताने 2-1ची आघाडी मिळवली असून मालिका अनिर्णित ठेवण्यासाठी इंग्लंडला भारताला पराभूत करावे लागणार आहे.
ओव्हलवर भारताने इंग्लंडला 157 धावांनी मात दिल्याने इंग्लंड क्रिकेट बोर्डाने धडाकेबाज फलंदाज असणार्या बटलरला संघात स्थान दिले आहे. बटलरबरोबरच लेचचाही समावेश करण्यात आला असून मोहीन आलीसोबत तो फिरकी गोलंदाज म्हणून पर्यायी खेळाडू म्हणून उपलब्ध असेल.
श्रीलंका आणि भारताविरोधातील सहा सामन्यांमध्ये एकूण 28 बळी घेणारा लेच मार्चनंतर कसोटी खेळलेला नाही. दुसरीकडे बटलरसारखा स्फोटक फलंदाज संघात असल्याने इंग्लंडच्या फलंदाजीला मधल्या फळीला बळकटी मिळणार आहे. आपल्या स्फोटक खेळीसोबतच बटलर संयमी खेळीसुद्धा करतो. त्यामुळेच त्याला संघात स्थान देण्यात आले आहे, तर सॅम बिलिंग्जला पाचव्या कसोटीमधून वगळण्यात आलेय. 10 तारखेपासून मँचेस्टरमध्ये पाचवा कसोटी सामना सुरू होणार आहे.